अमरावती : चिचाटी धबधबा येथे‘गाइडेड नेचर ट्रेल’ सुरू; २० स्थानिक युवकांना रोजगार
अमरावती, 08 ऑगस्ट (हिं.स.) | मेळघाट प्रादेशिक वनविभाग, परतवाडा अंतर्गत घटांग वनपरिक्षेत्रातील चिचाटी गावाजवळील प्रसिद्ध चिचाटी धबधबा येथे मार्गदर्शित निसर्ग भ्रमंती अर्थात ‘गाइडेड नेचर ट्रेल’ सुरू करण्यात आली आहे. निसर्गप्रेमी पर्यटकांचा या उपक्रमा
चिचाटी धबधब्याकडे ‘गाइडेड नेचर ट्रेल’ सुरू; २० स्थानिक युवकांना रोजगार


अमरावती, 08 ऑगस्ट (हिं.स.) | मेळघाट प्रादेशिक वनविभाग, परतवाडा अंतर्गत घटांग वनपरिक्षेत्रातील चिचाटी गावाजवळील प्रसिद्ध चिचाटी धबधबा येथे मार्गदर्शित निसर्ग भ्रमंती अर्थात ‘गाइडेड नेचर ट्रेल’ सुरू करण्यात आली आहे. निसर्गप्रेमी पर्यटकांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अवघ्या दोन आठवड्यांत ६०० हून अधिक पर्यटकांनी या निसर्गभ्रमंतीचा आनंद घेतला आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमामुळे चिचाटी गावातील २० स्थानिक युवकांना थेट रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.

निसर्गप्रेमींच्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला प्रतिसाद देत तसेच स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने २५ जुलैपासून हा उपक्रम अधिकृतपणे सुरू करण्यात आला आहे. चिचाटी ग्रामसभेच्या ठरावानुसार आणि मेळघाट प्रादेशिक वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त वन व्यवस्थापन समिती, चिचाटीमार्फत या उपक्रमाचे व्यवस्थापन केले जात आहे.स्थानिक गाईड बंधनकारक पर्यटकांच्या सुरक्षिततेसह त्यांना परिसराची नैसर्गिक आणि जैवविविधतेची माहिती मिळावी, यासाठी प्रत्येक पर्यटकांसोबत चिचाटी गावातील स्थानिक निसर्ग मार्गदर्शक असणे बंधनकारक करण्यात आले आहे. निसर्गभ्रमंतीसाठी प्रतिव्यक्ती २०० रुपये शुल्क आकारण्यात येते. धारणी व चिखलदरा तालुक्यातील स्थानिक नागरिकांसाठी हे शुल्क १०० रुपये ठेवण्यात आले आहे. या शुल्कामध्ये निसर्ग मार्गदर्शकाचे मानधन समाविष्ट आहे. चिचाटी गावापासून धबधब्यापर्यंतचा सुमारे चार किलोमीटरचा मार्ग निसर्गसौंदर्याने नटलेला असून, हिरवाई, जंगल आणि धबधब्याचे मनोहारी दृश्य पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे.

६०० पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसादजुलै महिन्यात सुरू झालेल्या या उपक्रमाला काही दिवसांतच ६०० हून अधिक पर्यटकांनी भेट दिली. पर्यटनाला चालना देण्यासोबतच स्थानिक युवकांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाल्याने या उपक्रमाचे विशेष महत्त्व आहे. निसर्गभ्रमंतीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी संयुक्त वन व्यवस्थापन समितीकडे पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. अमरावतीहून चिचाटी येथे जाण्यासाठी धामणगाव गढीमार्गे देवगाव किंवा परतवाडामार्गे चिचाटी येथे पोहोचता येते. अधिकाधिक निसर्गप्रेमींनी या मार्गदर्शित निसर्गभ्रमंतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande