
बीड, 08 ऑगस्ट (हिं.स.)। अंबाजोगाई बसस्थानकातील स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होऊ लागल्याने बसस्थानक प्रशासनाने फरशी स्वच्छ करण्यासाठी अत्याधुनिक स्वच्छता मशिन आणले आहे. या मशिनद्वारे बसस्थानक परिसरातील फरशीची साफसफाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
अंबाजोगाई बसस्थानकात दररोज मोठ्या संख्येने प्रवाशांची वर्दळ असते. त्यामुळे बसस्थानकातील फरशीवर धूळ, माती तसेच अन्य कचरा साचत असल्याने स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होत होता. पारंपरिक पद्धतीने सफाई करण्यास लागणारा वेळ आणि मनुष्यबळ लक्षात घेता आता यांत्रिक पद्धतीने स्वच्छता करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अत्याधुनिक मशिनच्या सहाय्याने फरशीची जलद आणि प्रभावीपणे साफसफाई करता येत असल्याने बसस्थानक परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत होणार आहे. बसस्थानक प्रशासनाच्या या उपक्रमामुळे प्रवाशांना अधिक स्वच्छ आणि चांगले वातावरण मिळण्याची अपेक्षा आहे.
बसस्थानकातील स्वच्छता नियमितपणे राखली जावी आणि या मशिनचा सातत्याने वापर करण्यात यावा, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis