
लातूर, 08 ऑगस्ट (हिं.स.)।
सहकार आणि साखर उद्योगात आपल्या उत्कृष्ट कामगिरीचा ठसा उमटवणाऱ्या वैशालीनगर, निवळी (लातूर) येथील 'विलास सहकारी साखर कारखान्यास' 'डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन-इंडिया, पुणे' (DSTA) यांच्या वतीने दिला जाणारा मानाचा सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना - २०२६ हा विशेष पुरस्कार पुण्यात शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
'डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन-इंडिया, पुणे' यांच्या ७१ व्या वार्षिक परिषदेत व 'साखर एक्सपो - २०२६' प्रसंगी हॉटेल जे. डब्ल्यु. मॅरियट, पुणे येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
दिग्गजांच्या उपस्थितीत सोहळा
या पुरस्कार वितरण सोहळ्याला माजी मंत्री, आमदार जयंतराव पाटील, सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री राजेश टोपे, साखर कारखाना आयुक्त डॉ. संजय कोलते यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच 'द वेस्ट इंडिया शुगर मील असोसिएशन'चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेशबाबा भोसले, 'द शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन'चे अध्यक्ष संजय अवस्थी, 'द साऊथ इंडियन शुगरकेन अँड शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन'चे अध्यक्ष आर. व्ही. कुंभार, सोहन शिरगावकर, एस. डी. बोखारे, एम. के. पटेल, सी. जी. माने आदी मान्यवर उपस्थित होते.
कारखान्याच्या वतीने पुरस्कार स्वीकार
विलास साखर कारखान्याच्या वतीने हा मानाचा पुरस्कार कारखान्याचे माजी आमदार तथा व्हाईस चेअरमन वैजनाथराव शिंदे, विलास कारखाना युनीट १ चे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, युनीट २ चे कार्यकारी संचालक आत्माराम पवार, संचालक रवींद्र काळे, अमृत जाधव, सतिश शिंदे पाटील, अनंत बारबोले, नरसिंग बुलबुले, नितीन पाटील, गोवर्धन मोरे, रंजीत पाटील, रसूल पटेल, तात्यासाहेब पालकर, हणमंत पवार, रामराव साळुंके, दीपक बनसोडे, सुभाष माने, ऊस उत्पादक सभासद रमेश देशमुख व सर्व खातेप्रमुख आणि विभागप्रमुखांनी स्वीकारला.
उत्कृष्ट कामगिरीची दखल
लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेतून उभा राहिलेला हा कारखाना सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या कुशल नियोजनानुसार तसेच माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धीरज विलासराव देशमुख आणि कारखान्याच्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करत आहे. कारखान्याने गेल्या तीन वर्षांत ऊस गाळप, साखर उत्पादन, साखर उतारा, तांत्रिक क्षमतेचा वापर, पाणी बचत, पाणी पुनर्वापर आणि कडक आर्थिक शिस्त यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. याशिवाय, ऊस विकास योजना, ऊस लागवड, तोडणी व वाहतूक यांत्रिकीकरण, हार्वेस्टरचा प्रभावी वापर, पारदर्शक प्रशासकीय कामकाज, शासनाचे सर्व कर वेळेत भरणे, तसेच सभासद, ऊस उत्पादक व कामगारांची सर्व देणी निरंक ठेवून एफआरपीपेक्षा (FRP) अधिकचा उच्चांकी दर (रु. ३,१७१/- प्रति मे.टन) देणे तसेच कारखान्याला आजपर्यंत सहकार क्षेत्रातील राज्य व राष्ट्रीय पातळीवरील तब्बल ३९ पुरस्कार मिळाले मान्यवरांनी यावेळी कारखान्याच्या या कामगीरीचे कौतुक केले
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis