
पुणे, 08 ऑगस्ट (हिं.स.)। पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील सीएनजीचा कमी दाब आणि अपुरा पुरवठ्याची समस्या गेल्या महिनाभरापासून कायम आहे. स्थानिक पातळीवर वारंवार प्रयत्न करूनही या समस्येवर अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. परिणामी सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, काही ठिकाणी पुरवठा अपुरा असल्याने पंप बंद ठेवण्याची वेळ आली आहे.
सीएनजीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः रिक्षा, टॅक्सी आणि सीएनजीवर अवलंबून असलेल्या व्यावसायिक वाहनचालकांवर याचा थेट परिणाम होत आहे. इंधन भरण्यासाठी बराच वेळ रांगेत थांबावे लागत असल्याने त्यांच्या दैनंदिन व्यवसायावरही परिणाम होत आहे. स्थानिक पातळीवर संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करूनही समस्या कायम राहिल्याने पेट्रोल डीलर्स असोसिएशन पुणे (पीडीए)ने आता थेट केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीपसिंह पुरी यांच्याकडे धाव घेतली आहे. सीएनजी पुरवठ्याच्या प्रश्नावर तातडीने भेट देऊन चर्चा करण्याची मागणी असोसिएशनने केली आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या महिनाभरापासून सीएनजी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला असून, केंद्र सरकारने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून पुरवठा सुरळीत करावा, अशी विनंती पेट्रोल डीलर्स असोसिएशनने केली आहे. पुरवठ्यातील अनियमितता आणि कमी दाबाची समस्या तातडीने दूर न झाल्यास सीएनजी वाहनचालकांसह पेट्रोल पंपचालकांनाही आणखी अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु