‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतूक नियमभंगाच्या तक्रारी घरबसल्या
जुलैमध्ये २५७५ तक्रारी दाखल; बेकायदा पार्किंगच्या ७८८ तक्रारी पुणे, ८ ऑगस्ट (हिं.स.) : वाहतूक कोंडी, नो-पार्किंगमध्ये उभी असलेली वाहने, रस्त्यावर उभी केलेली अवजड वाहने, चुकीच्या पद्धतीने वाहन चालविणे, सिग्नल तोडणे यांसह विविध वाहतूक नियमभंगाच्या घ
rto


जुलैमध्ये २५७५ तक्रारी दाखल; बेकायदा पार्किंगच्या ७८८ तक्रारी

पुणे, ८ ऑगस्ट (हिं.स.) : वाहतूक कोंडी, नो-पार्किंगमध्ये उभी असलेली वाहने, रस्त्यावर उभी केलेली अवजड वाहने, चुकीच्या पद्धतीने वाहन चालविणे, सिग्नल तोडणे यांसह विविध वाहतूक नियमभंगाच्या घटनांची तक्रार करण्यासाठी नागरिकांना आता पोलिस ठाणे अथवा वाहतूक विभागात जाण्याची गरज नाही. पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांच्या ‘ट्रॅफिक बडी’ व्हॉट्सॲप चॅटबॉटच्या माध्यमातून नागरिकांना पुराव्यासह घरबसल्या तक्रार नोंदविता येत आहे.

जुलै महिन्यात ‘ट्रॅफिक बडी’च्या माध्यमातून वाहतूक पोलिसांकडे तब्बल २ हजार ५७५ तक्रारी प्राप्त झाल्या. यामध्ये सर्वाधिक ९४५ तक्रारी वाहतूक नियमांच्या उल्लंघनाबाबत, तर त्याखालोखाल ७८८ तक्रारी बेकायदा पार्किंगबाबत प्राप्त झाल्या आहेत.

डिजिटल माध्यमातून तक्रारी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिक आणि वाहतूक पोलिसांमधील संवाद अधिक वेगवान झाला आहे. तसेच तक्रारींसोबत फोटो किंवा व्हिडिओसारखे पुरावे सादर करता येत असल्याने संबंधित वाहतूक नियमभंगाच्या घटनांवर तत्काळ कार्यवाही करण्यास पोलिसांना मदत होत आहे.

पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी १८ जून २०२५ पासून ‘ट्रॅफिक बडी’ व्हॉट्सॲप चॅटबॉटची सुविधा सुरू केली आहे. नागरिकांनी ८७८८६४९८८५ हा क्रमांक आपल्या मोबाइलमध्ये सेव्ह केल्यानंतर या क्रमांकावरून वाहतूक नियमभंगाच्या घटनांची तक्रार नोंदविता येते.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासोबतच नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी ‘ट्रॅफिक बडी’ उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असून, शहरातील वाहतूक शिस्त सुधारण्यास या डिजिटल सुविधेची मदत होत आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande