वृक्षलागवडीसोबत वृक्षसंवर्धनही काळाची गरज :- मंत्री गिरीश महाजन
उन्नत नाशिक’ अभियानांतर्गत एकलहरे येथे वृक्षारोपण; ‘मिशन ग्रीन मॉन्सून’चा सातवा टप्पा नाशिक, 09 ऑगस्ट (हिं.स.)। केवळ वृक्षलागवड करून आपली जबाबदारी संपत नाही, तर लावलेल्या प्रत्येक वृक्षाचे संगोपन आणि संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. ‘झाड लावा, झाड
Along with tree plantation,


उन्नत नाशिक’ अभियानांतर्गत एकलहरे येथे वृक्षारोपण; ‘मिशन ग्रीन मॉन्सून’चा सातवा टप्पा

नाशिक, 09 ऑगस्ट (हिं.स.)।

केवळ वृक्षलागवड करून आपली जबाबदारी संपत नाही, तर लावलेल्या प्रत्येक वृक्षाचे संगोपन आणि संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. ‘झाड लावा, झाड जगवा’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरवून प्रत्येक नागरिकाने वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

‘उन्नत नाशिक अभियान’ आणि ‘आपले नाशिक हरित नाशिक’ या संकल्पनेअंतर्गत ‘मिशन ग्रीन मॉन्सून’च्या सातव्या टप्प्यात एकलहरे येथील वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने संस्थेच्या पटांगणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मंत्री गिरीश महाजन बोलत होते.

नाशिकची ओळख धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक शहराबरोबरच आता पर्यावरणपूरक आणि हरित शहर म्हणून निर्माण व्हावी, यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ मोठ्या संख्येने भाविक येण्याचा सोहळा न राहता स्वच्छता, शिस्त आणि शाश्वत विकासाचा आदर्श ठरावा, यासाठी विकासकामांसोबत पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य दिले जात आहे.

‘मिशन ग्रीन मॉन्सून’अंतर्गत नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड आणि रोपवाटप करण्यात येत आहे. सहाव्या टप्प्याअखेर नाशिकमध्ये एकूण ३७ हजार वृक्षांच्या लागवडीचा व वाटपाचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. यामध्ये सातपूर देवराई व शिंदे ग्रामपंचायत हद्दीत ५ हजार, म्हसरूळ वनराई व त्र्यंबक रोड परिसरात ६ हजार, नंदिनी नदीच्या दुतर्फा ६ हजार देशी वृक्ष, दरई माता परिसरात ५ हजार, पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्र परिसरात २ हजार, मागणीनुसार प्रभागनिहाय ८ हजार ५०० रोपांचे वाटप आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ परिसरात ४ हजार ५०० वृक्षारोपणाचा समावेश आहे.

आगामी काळात वृक्षलागवडीच्या बाबतीत महाराष्ट्र देशात अग्रस्थानी राहील, तसेच नाशिकमध्येही मोठ्या प्रमाणावर वृक्षांची संख्या वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असे मंत्री महाजन यांनी सांगितले. मात्र, त्यासाठी केवळ शासकीय यंत्रणाच नव्हे तर सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, ग्रामपंचायती आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

“फक्त झाड लावणे पुरेसे नाही, तर ते जगवणे हेच खरे पुण्य आहे,” या भावनेतून प्रत्येकाने आपल्या परिसरातील वृक्षांची काळजी घ्यावी. वृक्षांना नियमित पाणी, संरक्षण आणि देखभाल मिळाली तरच वृक्षलागवड मोहिमेचे खऱ्या अर्थाने यश मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

एकलहरे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत परिसर तसेच श्री एकांबरेश्वर महादेव मंदिर परिसरातही वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमामुळे एकलहरे परिसराच्या हरित विकासाला चालना मिळणार असून, विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांमध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहोचण्यास मदत होणार आहे.

यावेळी वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळाचे कोंडाजी मामा आव्हाड, प्रकाश घुगे, एकलहरे ग्रामपंचायतीचे सरपंच अरुण दुशिंग, संपत वाघ, सुधाकर बडगुजर, संस्थेचे संचालक, महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande