साड्या अन् पैशांच्या आमिषाने केला घात; वृद्ध महिलेचे १० हजारांचे दागिने लांबवले
लातूर, 09 ऑगस्ट (हिं.स.)। साड्या अन् पैशांच्या आमिषाने घातला घात! अहमदपूर तहसील आवारात ६५ वर्षीय वृद्ध महिलेचे १० हजारांचे दागिने लांबवले शासनाकडून साड्या व पैशांचे वाटप करण्यात येत असल्याचे आमिष दाखवून एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेची दिशाभूल करत अज्
फसवणूक


लातूर, 09 ऑगस्ट (हिं.स.)।

साड्या अन् पैशांच्या आमिषाने घातला घात! अहमदपूर तहसील आवारात ६५ वर्षीय वृद्ध महिलेचे १० हजारांचे दागिने लांबवले

शासनाकडून साड्या व पैशांचे वाटप करण्यात येत असल्याचे आमिष दाखवून एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेची दिशाभूल करत अज्ञात चोरट्यांनी तिच्या अंगावरील सुमारे १० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हातचलाखीने लंपास केल्याची घटना अहमदपूर तहसील कार्यालयाच्या आवारात घडली. विशेष म्हणजे, यापूर्वीही तहसील कार्यालयात याच धर्तीवर महिलांना लुटण्याचे प्रकार घडले असून, पुन्हा अशाच घटनेची पुनरावृत्ती झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेथी (ता. चाकूर, जि. लातूर) येथील रहिवासी असलेल्या पार्वतीबाई माधव वाडकर (वय ६५) या अहमदपूर तहसील कार्यालय परिसरात आल्या होत्या. यावेळी एका अज्ञात व्यक्तीने त्यांना “शासनाच्या वतीने तहसीलमध्ये साड्या व पैसे मिळणार आहेत” असे सांगून भुलवले. त्यानंतर त्या व्यक्तीने त्यांना तहसील कार्यालयाच्या मुख्य गेटच्या उजव्या बाजूस नेले. तेथे पुन्हा भुलथापा देऊन त्यांच्या अंगावरील दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी पिशवीत काढून ठेवण्यास सुचवले. महिलेने विश्वास ठेवून दागिने पिशवीत ठेवताच चोरट्यांनी हातचलाखी करून पिशवीतील ऐवज लंपास केला.

चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये दोन ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील फुले (अंदाजे किंमत ५,००० रुपये) आणि दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणीमंगळसूत्र (अंदाजे किंमत ५,००० रुपये), अशा एकूण १० हजार रुपये किमतीच्या दागिन्यांचा समावेश आहे.

तहसील कार्यालयात यापूर्वीही अशाच प्रकारे ‘योजनेचा लाभ मिळवून देतो’ असे आमिष दाखवून एका महिलेची फसवणूक झाली होती. त्यावेळी तहसीलदारांच्या केबिनबाहेर भामट्यांनी महिलेला बोलावून ‘तपासणी करायची आहे’ असे सांगत दागिने व रोकड लंपास केली होती. आता पुन्हा त्याच धर्तीवर तहसील कार्यालयाच्या आवारातच महिला लुटली गेल्याने शासकीय कार्यालयातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

घटनेनंतर पीडित पार्वतीबाई वाडकर यांनी अहमदपूर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली. त्यावरून अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५३३/२०२६, कलम ३०३(२), भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार १४२३ शेख करीत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून अज्ञात चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, अशा प्रकारच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये, विशेषतः महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरिकांनी आणि वृद्ध महिलांनी अनोळखी व्यक्तींच्या कोणत्याही आमिषाला बळी पडू नये आणि आपले दागिने सुरक्षित ठेवावेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande