एका आठवड्यात दोन दुर्मिळ चंचूवाळा (बेकीड ब्लाइंड) सापांची सुटका
परभणी, 09 ऑगस्ट (हिं.स.)। परभणी परिसरात अत्यंत क्वचित आढळणाऱ्या चंचुवाळा (बेकीड ब्लाइंड स्नेक Beaked Blind Snake) या दुर्मिळ सापांचे दर्शन झाले आहे. Animal Welfare Charitable Trust, Parbhani (AWCT Parbhani) या NGO ने अवघ्या एका आठवड्याच्या कालावधी
Q


परभणी, 09 ऑगस्ट (हिं.स.)।

परभणी परिसरात अत्यंत क्वचित आढळणाऱ्या चंचुवाळा (बेकीड ब्लाइंड स्नेक Beaked Blind Snake) या दुर्मिळ सापांचे दर्शन झाले आहे. Animal Welfare Charitable Trust, Parbhani (AWCT Parbhani) या NGO ने अवघ्या एका आठवड्याच्या कालावधीत दोन सापांची यशस्वी व सुरक्षितपणे सुटका केली. यातील पहिला साप हा खानापूर फाटा परिसरातील नामदेव रिक्षे यांच्या घरात आढळून आला. तर दुसरा साप रामकृष्ण नगर परिसरातील महावीर विभुते यांच्या घरी धामण सापाचा शोध घेत असताना अचानक आढळून आला. दोन्ही सापांचे 'एनजीओ'च्या वतीने सुरक्षितपणे रेस्क्यू करून त्यांना योग्य नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

चंचुवाळा (बेकीड ब्लाइंड स्नेक) हा अतिशय लहान, बिनविषारी आणि मानवासाठी पूर्णपणे निरुपद्रवी साप आहे. त्याचे शरीर साधारणपणे दंडगोलाकार, बारीक आणि गुळगुळीत खवल्यांनी झाकलेले असते. प्रौढ सापाची लांबी साधारण १५ ते ३० सेंमीपर्यंत असू शकते. त्याचे डोके शरीरापेक्षा फारसे वेगळे दिसत नाही आणि डोक्याचा पुढील भाग चोचीसारखा टोकदार दिसतो.

हा साप प्रामुख्याने जमिनीखाली राहणारा असून सैल व ओलसर माती, शेतीची जमीन, बागा, जंगल परिसर, पानांच्या ढिगाऱ्याखाली तसेच दगड किंवा लाकडाखाली आढळू शकतो. जमिनीखाली बिळे करून राहणे ही त्याची प्रमुख जीवनशैली आहे. त्यामुळे सामान्य परिस्थितीत हा साप सहजपणे दिसत नाही. पावसाळ्यात किंवा माती खोदताना व हलवल्यानंतर तो क्वचितच जमिनीच्या पृष्ठभागावर आढळतो.

या सापाचे डोळे अतिशय लहान आणि कमी विकसित असतात. जमिनीखालील जीवनशैलीशी जुळवून घेताना तो वातावरणाचा शोध घेण्यासाठी वास आणि स्पर्शज्ञानावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो.

बेकीड ब्लाइंड स्नेकचा आहार प्रामुख्याने मुंग्या आणि वाळवी यांच्यावर आधारित असतो. विशेषतः मुंग्या व वाळवींची अंडी आणि अळ्या हा त्याच्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहेत. जमिनीखाली बिळांमध्ये किंवा वसाहतींमध्ये जाऊन तो आपले भक्ष्य शोधतो. त्यामुळे हा साप नैसर्गिकरित्या मुंग्या व वाळवींच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो.

आकाराने लहान असला तरी हा साप पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. जमिनीखाली राहून कीटकांचे नियंत्रण करण्याबरोबरच तो स्थानिक जैवविविधतेचा एक महत्त्वाचा घटक आहे. या सापाचे दर्शन क्वचितच होत असल्याने त्याच्या आढळाची प्रत्येक नोंद स्थानिक जैवविविधतेच्या अभ्यासासाठी महत्त्वाची ठरू शकते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande