
पुणे, 09 ऑगस्ट (हिं.स.)। येथील बारामती विमानतळ परिसरातून मोठी बातमी समोर आली आहे. बारामती विमानतळाच्या परिसरात एक शिकाऊ विमान कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. हे शिकाऊ विमान नेमके कोणत्या कारणामुळे कोसळले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. तसेच विमानातील पायलट किंवा अन्य व्यक्ती जखमी झाली आहे का, याचीही अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. दुर्घटनेनंतर बचावकार्य आणि परिस्थितीचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. अपघाताच्या कारणांचा तपास संबंधित यंत्रणांकडून केला जात आहे.
दरम्यान, बारामती विमानतळ आणि परिसरात यापूर्वीही विमान दुर्घटनांच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या ताज्या घटनेनंतर विमानतळ परिसरातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. बारामतीमध्ये मागील आठ महिन्यांत विमान दुर्घटनेची ही तिसरी घटना असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात व्हीएसआर व्हेंचर्सचे चार्टर विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते. या दुर्घटनेत तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर बारामतीतील विमान वाहतुकीच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. यानंतर मे महिन्यात बारामतीच्या गोजुबावी गावाच्या हद्दीत आणखी एका शिकाऊ विमानाचा अपघात झाला होता. हे विमान आपत्कालीन लँडिंग करत असताना शेतात कोसळले होते. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु