
कोल्हापूर, 09 ऑगस्ट (हिं.स.) |कोल्हापूर शहराचा विकास करायचा असेल, हद्दवाढ करणं फार गरजेचं आहे. हद्दीबाहेरच्या लोकांच्या अडचणी आहेत, पण येथील लोकप्रतिनिधींना सांगतो, त्यांच्या कोणत्याही अडचणी असतील मी 100 टक्के सोडवून देतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट आश्वासन देऊन हद्दवाढीबाबत शासनाची भूमिका स्पष्ट केली आणि हद्दवाढीचा चेंडू येथील लोक आणि लोकप्रतिनिधी यांच्या कोर्टात टाकला. कोल्हापूर शहरात पूर्ण झालेल्या अनेक विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पार पडला. यनिमित्ताने झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कोल्हापूरकरांनी आम्हाला भरभरून आशीर्वाद दिलेला आहे. त्यामुळे आता जर आम्ही तुमचं काम केलं नाही, तर आमच्यासारखे करंटे कोणीच नाही मी असेल, शिंदे साहेब असतील किंवा सुनेत्रा वहिनी असतील, आमचं सगळ्यांचं कोल्हापूरवर, पांढऱ्या-तांबड्यावर प्रेम आहे, अजितदादांचं तर कोल्हापूरवर विशेष प्रेम होतं. म्हणून या सगळ्या नेत्यांना सांगतो, काही काळजी करू नका, यापूर्वीही कोल्हापूरसाठी कधी कमी पडू दिलं नाही, यापुढेही कमी पडू देणार नाही, जाता-जाता एक बॉल टाकून देतो एक गोष्ट नक्की आहे, शहराचा विकास करायचा असेल हद्दवाढ करणं फार गरजेचं आहे.
यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर तसेच कोल्हापूर मनपा महापौर रुपाराणी निकम यांनी कोल्हापूर हद्दवाढीचा मुद्दा उपस्थित केला होता. मुश्रीफ यांनी कोल्हापूर हद्दवाढीत विरोधात असलेल्या करवीरचे आमदार चंद्रदीप नरके आणि कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांचेही कान टोचले. दोघांनी सहकार्य कराव जसे थेट त्यांनी व्यासपीठावरून सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, कोल्हापूरात हायकोर्ट आलं आहे. आता त्या हायकोर्टाला शेंडा पार्कला 75 एकर जागा आपण देत आहोत. हायकोर्टमुळे या शहरामध्ये रोज 20-25 हजार लोकं येणार त्यामुळे या शहराला अधिक सुनियोजित आपल्याला करावं लागेल. आयटी पार्क करत आहोत. अतिशय सुंदर कन्व्हेन्शन सेंटर करत आहोत. हॉकी स्टेडियमसाठी 'खेलो इंडिया'च्या माध्यमातून निधी दिला असून अधिक निधीची गरज असल्यास तो उपलब्ध करून दिला जाईल. कोल्हापुरात भव्य आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी जागा उपलब्ध केली असून BCCI च्या माध्यमातून आधुनिक स्टेडियम उभारले जाईल. फुटबॉल प्रेमींसाठीही आवश्यक क्रीडा सुविधांवर भर देणार असल्याचेही त्यांनी सांगून त्यांनी पुढच्या काळामध्ये आपल्या आशीर्वादाने निश्चितपणे कोल्हापूर शहराकरता जो-जो विचार आपण सगळ्यांनी केला असेल, तो टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू, हा विश्वास मी आपल्याला देतो असे सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar