
चंद्रपूर, 09 ऑगस्ट (हिं.स.)।
जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये बालकांना पुरविण्यात येणाऱ्या गरम व ताज्या आहाराच्या गुणवत्तेबाबत गंभीर बाबी समोर आली असून, यामुळे हजारो बालकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गोंडपिंपरी आणि पोंभुर्णा तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी केंद्रांना पुरविण्यात येणाऱ्या आहाराची प्रयोगशाळेमार्फत तपासणी करण्यात आली असता, काही खाद्यपदार्थ निर्धारित मापदंडानुसार नसल्याचे, तर काही पदार्थ सेवनासाठी असुरक्षित असल्याचे तपासणी अहवालात नमूद करण्यात आले आहे. या गंभीर प्रकरणावर विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेत सरकार आणि प्रशासनाला धारेवर धरले.
महिला व बाल विकास विभागाच्या नागपूर विभागीय उपआयुक्त कार्यालयाने १८ जून २०२६ रोजी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्तांना पाठविलेल्या पत्रासोबत प्रादेशिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, नागपूर यांनी केलेल्या आहार तपासणीचे अहवाल जोडण्यात आले आहेत. या अहवालातून चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी आणि पोंभुर्णा येथील अंगणवाडी केंद्रांना पुरविण्यात येणाऱ्या काही खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव