
छत्रपती संभाजीनगर, 09 ऑगस्ट (हिं.स.)। ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेच्या बंद नलिका वितरण प्रणालीच्या कामामुळे बाधित झालेल्या ३५ शेतकऱ्यांना त्यांच्या फळबागांच्या कृषी मूल्यांकनानुसार मोबदल्याचे धनादेश आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. खादगाव, सुलतानपूर, सोनवडी, गाव तांडा, खेर्डा, मोती तांडा, दावरवाडी आदी गावांतील शेतकऱ्यांच्या फळबागांचे कृषी विभागामार्फत मूल्यांकन करण्यात आले होते. या शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. अखेर या प्रयत्नांना यश मिळाले असून, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेचे काम प्रगतीपथावर असून, या प्रकल्पामुळे परिसरातील शेतीला शाश्वत पाण्याची सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. सिंचनाची उपलब्धता वाढल्याने शेती अधिक समृद्ध होऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीलाही चालना मिळणार आहे. असे त्यांनी सांगितले. विकासकामे करताना केवळ प्रकल्प पूर्ण करणे महत्त्वाचे नसून, या विकासाचा परिणाम ज्यांच्या जीवनावर होतो, त्या शेतकऱ्यांच्या हिताची काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे. आज मिळालेला मोबदला हा केवळ धनादेश नसून, शेतकऱ्यांच्या हक्कांना मिळालेली मान्यता आणि त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीच्या दिशेने पडलेले महत्त्वाचे पाऊल आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis