देवगिरी प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेला राज्यभरातून उदंड प्रतिसाद
बीड, 09 ऑगस्ट (हिं.स.)। देवगिरी प्रतिष्ठान, बीड यांच्या वतीने साहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेली १७ वी राज्यस्तरीय शालेय व महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा बीड येथील ''तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान मह
वक्तृत्व स्पर्धा


बीड, 09 ऑगस्ट (हिं.स.)।

देवगिरी प्रतिष्ठान, बीड यांच्या वतीने साहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेली १७ वी राज्यस्तरीय शालेय व महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा बीड येथील 'तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयात' अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या सुमारे १६५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवून आपल्या प्रभावी वक्तृत्वातून साहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना उजाळा दिला.

स्पर्धेचे उद्घाटन बलभीम महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रो. डॉ. मनोहर सिरसाट यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की, साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याने समाजाला एकोपा, समता आणि परिवर्तनाचा विचार दिला. त्यांच्या साहित्यामुळे मराठी साहित्य अधिक समृद्ध व व्यापक झाले, तसेच दलित साहित्य चळवळीला प्रेरणा मिळाली. अण्णाभाऊंच्या मानवतावादी विचारांना कृतीची जोड देण्याची गरज असून, वक्तृत्वातून मांडलेले विचार केवळ भाषणापुरते न ठेवता ते समाजमनात रुजविण्याची जबाबदारी युवकांनी स्वीकारावी, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवगिरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. प्रदीप रोडे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी ‘मी भारतीय आहे’ ही भावना सर्वप्रथम आणि सर्वांत महत्त्वाची असल्याचे सांगत धर्म, जात आणि पंथाच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय एकात्मतेची जपणूक करण्याचे आवाहन केले. गेल्या १६ वर्षांपासून ही वक्तृत्व स्पर्धा सातत्याने आयोजित केली जात असल्याचे नमूद करत त्यांनी युवकांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता उद्योजकतेची कास धरावी, स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करावे आणि बदलत्या काळानुसार ज्ञान व कौशल्ये अद्ययावत ठेवावीत, असे आवाहन केले.

ही स्पर्धा वरिष्ठ (पदवी/पदव्युत्तर) आणि कनिष्ठ (इयत्ता ८ वी ते १२ वी) अशा दोन गटांमध्ये पार पडली. स्पर्धेतील वरिष्ठ गटात कोल्हापूरचा संकेत पाटील याने प्रथम (१०,०००), मुंबईचा यश पाटील याने द्वितीय (७,०००), तर इचलकरंजीचा सिद्धेश्वर मिसाळ याने तृतीय (५,०००) क्रमांक पटकावला. तसेच कनिष्ठ गटात बीडचा ऋतुराज काकडे याने प्रथम (७,०००), सोलापूरची प्रणाली धस हिने द्वितीय (५,०००), तर बीडची स्वरा लोकरे हिने तृतीय (३,०००) क्रमांक मिळविला. सर्व विजेत्यांना रोख रक्कमेसह स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, याशिवाय दोन्ही गटांतील प्रत्येकी तीन गुणवंत स्पर्धकांना प्रत्येकी १,००० चे उत्तेजनार्थ रोख पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

देवगिरी प्रतिष्ठानतर्फे सर्व स्पर्धक, शिक्षक व पालकांसाठी भोजन व अल्पोपहाराची मोफत व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमास तुलसी समूहातील विविध शाळा, महाविद्यालयांचे प्राचार्य शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व पालक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande