
अमरावती, 09 ऑगस्ट (हिं.स.)
पहिल्या यादीतील ३३ हजार शेतकऱ्यांना लाभ
राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेतील पहिल्या यादीतील लाभार्थ्यांच्या खात्यात कर्जाची रक्कम जमा होऊ लागली आहे. पहिल्या यादीतील ३३ हजार ४०१ शेतकऱ्यांचे ३०८ कोटी १६ लाख रुपयांचा कर्जमाफीचा लाभ त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला असल्याची माहिती सहकार विभागाने दिली आहे. जिल्ह्यातून एकूण एक लाख २४ हजार १४२ शेतकऱ्यांची यादी शासनाला पाठविण्यात आली आहे. कर्जमाफीच्या पहिल्या यादीत जिल्ह्यातील ७६ हजार ३५० शेतकऱ्यांचा समावेश आहे. कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. दरम्यान, पहिल्या यादीतील ५७ हजार ४८० शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे. यापैकी ३३ हजार ४०१ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. १८ हजार ८७० शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले नसल्याने त्यांची रक्कम अडकली आहे. कर्जमाफी मिळालेल्या लाभार्थ्यांमध्ये जिल्हा सहकारी बॅंकेच्या १३ हजार १८८ थकबाकीदारांचा समावेश आहे. या खातेदारांना १२१ कोटी ४१ लाख रुपयांची, तर राष्ट्रीय बॅंकेच्या २० हजार २१३ शेतकऱ्यांना १८६ कोटी ७४ लाख रुपये कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.
कर्जमाफीची जिल्ह्यातील स्थिती
पोर्टलवर अपलोड खातेसंख्या ः १, २४, १४२ पहिल्या यादीतील लाभार्थी संख्या ः ७६, ३५० ई-केवायसी झालेले खाते ः ५७, ४८० पहिल्या यादीतील कर्जमाफी मिळालेले लाभार्थी ः ३३, ४०१ (जिल्हा बॅंक ः १३, १८८ व राष्ट्रीय बॅंक ः २०, २१३) कर्जमाफीची जमा रक्कम ः ३०८.१६ कोटी (जिल्हा बॅंक ः १२१.४१ कोटी व राष्ट्रीय बॅंक ः १८६.७४ कोटी)
-----
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी