
रत्नागिरी, 9 ऑगस्ट (हिं.स.) । मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण येथील सीएनजी पंपासमोर दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला असून, या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. आज दुपारी सुमारे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.
मुंबईहून रत्नागिरीच्या दिशेने जाणारी कार क्रमांक एमएच ०८ एएक्स ६४९६ वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली. भरधाव कार प्रथम महामार्गावरील डिव्हायडरला जाऊन धडकली. त्यानंतर ती अनियंत्रित होऊन बाजूच्या लेनमध्ये शिरली आणि समोरून चिपळूणहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वॅगनार कार क्रमांक एमएच ४३ सीके ८८४० वर जोरदार धडकली. या भीषण धडकेत मयुरेश ढेबे, सायली शिर्के, अभिषेक शिर्के आणि मानसी प्रधान हे चार जण गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच चिपळूण शासकीय विश्रामगृहाजवळ तैनात असलेली रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थानची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिकेच्या तातडीच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने पुढील उपचारासाठी लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी