रत्नागिरी : बालमूर्तिकारांसाठी गणेशमूर्ती साकारण्याची स्पर्धा
रत्नागिरी, 9 ऑगस्ट (हिं.स.) येथील फोटोग्राफर कांचन मालगुंडकर यांच्या कांचन डिजिटलतर्फे यंदा सलग दुसऱ्या वर्षी बालमूर्तिकारांसाठी गणेशमूर्ती साकारण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार दि. १६ ऑगस्ट रोजी जयेश मंगल पार्क सभागृ
रत्नागिरी : बालमूर्तिकारांसाठी गणेशमूर्ती साकारण्याची स्पर्धा


रत्नागिरी, 9 ऑगस्ट (हिं.स.)

येथील फोटोग्राफर कांचन मालगुंडकर यांच्या कांचन डिजिटलतर्फे यंदा सलग दुसऱ्या वर्षी बालमूर्तिकारांसाठी गणेशमूर्ती साकारण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा रविवार दि. १६ ऑगस्ट रोजी जयेश मंगल पार्क सभागृहात होणार आहे.

बालमूर्तिकारांतील कलागुणांना, हस्तकौशल्याला वाव देण्यासाठी गतवर्षीपेक्षा अधिक मोठ्या स्तरावर ही स्पर्धा घेण्याचे कांचन डिजिटलतर्फे योजण्यात आले आहे.

स्पर्धा केवळ पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी आहे. १६ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत स्पर्धा होईल. आयोजकांतर्फे बालमूर्तिकारांना शाडूमाती मोफत पुरविण्यात येईल. मूर्ती घडविताना लागणारा वृत्तपत्र कागद, कपडा वगैरे साहित्य विद्यार्थ्यांसोबत पालकांनी पाठवावे. मूर्तीचे कोरीवकाम करण्यासाठी लागणारी कोरणी सामान विद्यार्थ्यांनी आणावे. बालमूर्तिकारांनी आपल्या संकल्पनेतील सुबक मूर्ती हस्तकौशल्यातून साकारायची आहे.

स्पर्धेदरम्यान प्रशिक्षक ओंकार संजय पाटणकर या मूर्तिकारांचे बहुमोल मार्गदर्शन लाभणार आहे. स्पर्धेनंतर तज्ज्ञ परीक्षकांतर्फे परीक्षण करून आकर्षक आणि अनोख्या मूर्तींना पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेतील मुलांसाठी अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी नावनोंदणी अनिवार्य असून नावनोंदणी करण्याची शेवटची तारीख १३ ऑगस्ट आहे. नोंदणी 9422576736 किंवा 8087296110 या क्रमांकांवर करता येईल.

बालमूर्तिकारांनी स्पर्धेत बहुसंख्येने सहभागी होऊन ही स्पर्धा यशस्वी करावी, असे आवाहन आयोजक कांचन डिजिटलचे संचालक कांचन मालगुंडकर यांनी केले आहे. गतवर्षीप्रमाणेच शहरातील विविध शाळांतील मुख्याध्यापक, शालेय व्यवस्थापन आणि आपल्या कलाशिक्षकांचे सहकार्य या स्पर्धेला लाभत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande