
नाशिक, 09 ऑगस्ट (हिं.स.)।
: ‘आपण कधी अमेरिका माता की जय ऐकले का? आपला देश मातृभूमीला अभिवादन करणारा देश आहे, म्हणून आपण भारत माता की जय म्हणतो. जल, जंगल आणि जमीन वाचवण्यासाठी आपण आवाज उठवला नाही, तर तीही आपल्याकडून हिरावून घेतली जाईल,’ असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला. दरम्यान संविधान हातात घेऊन आदिवासी, भूमिपुत्र आणि सामान्य जनतेच्या हक्कांसाठी लढण्याची वेळ आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नाशिक दौऱ्यात पत्रकारांशी बोलताना सपकाळ म्हणाले की ‘‘आपला शत्रू हातात सुरा घेऊन आपले अधिकारी कापत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेलाच सुरा घेऊन कापले जात आहे. शत्रू दिसत असला तरी आपण आपली तीन बोटे आपल्याकडे आहेत, हेही समजून घेतले पाहिजे. तुम्हाला चेतावणी देण्यासाठी मी आलो आहे.’’ आपण काँग्रेसचे अध्यक्ष झालो तेव्हा आदिवासी समाजातील असल्याची ओळ आपल्या नावासोबत दिसत होती; त्याचे कारण आजही आपल्याला माहीत नसल्याचे सांगत सपकाळ यांनी आदिवासी समाजाशी असलेले आपले नाते स्पष्ट केले. ‘‘मी दिवाळी आदिवासी कुटुंबासोबत साजरी करतो. अतिदुर्गम भागात जातो. आदिवासींच्या प्रश्नांशी माझे नाते आहे,’ संविधान लिहिणाऱ्या परिषदेला पाठिंबा देणारा हा काँग्रेस पक्ष आहे. संविधानाच्या जीवावर मनुवादी, भाजप आणि आरएसएस उठले आहेत. आदिवासींचा अधिकारी कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. जल, जंगल आणि जमीन आपली असताना ती आपल्याकडून काढून घेतली जात आहे. त्यामुळे हातात संविधान घेऊन ही लढाई लढावी लागणार आहे,’’ असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
मुंबईच्या गरजांचा संदर्भ देत त्यांनी सरकारच्या धोरणांवरही टीका केली. ‘‘मुंबईला मोठ्या प्रमाणात भाजीपाला, दूध, धान्य आणि पाणी लागते. मुंबई बाकाबका खातेय; मात्र आता मुंबईला सांगण्याची वेळ आली आहे.आदिवासींच्या जमिनीच्या खरेदी-विक्रीवर निर्बंध असतानाही त्या ९९ वर्षांच्या करारावर घेण्याचा मार्ग वापरला जात असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. ‘‘आदिवासीची जमीन खरेदी-विक्री करता येत नाही; मात्र ९९ वर्षांच्या करारावर घेता येते. त्याच्या विरोधात आपण लढाई लढली पाहिजे,’’ अशी भूमिका त्यांनी मांडली.खा.राहुल गांधी भूमिपुत्रांची लढाई लढत असल्याचे सांगत सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांवरही टीका केली. ‘‘ही सत्ता जोपर्यंत आहे, तोपर्यंत अदानी-अंबानी यांचे हात मजबूत होतील,’’ असा आरोप त्यांनी केला.
चौकट
‘आपल्याकडील गेले ते कावळे, राहिले ते मावळे’
अलीकडे उठलेले ‘झेन झी’चे वादळ दिल्लीत पोहोचल्याचा दावा करत सपकाळ यांनी बदलत्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. ‘‘आपल्याकडील गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे,’’ अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI