
मुंबई, 09 ऑगस्ट (हिं.स.)। जिओने आपल्या ग्राहकांसाठी ओटीटी मनोरंजनाची मोठी ऑफर जाहीर केली आहे. कंपनीने आता दीर्घकालीन ओटीटी पास उपलब्ध करून दिले असून, ८४ दिवसांचा पास ५५० रुपये आणि ३६५ दिवसांचा वार्षिक पास २ हजार रुपयांत मिळणार आहे. यापूर्वी उपलब्ध असलेला २८ दिवसांचा २०० रुपयांचा पासही कायम ठेवण्यात आला आहे. हे नवीन पास ७ ऑगस्टपासून मायजिओ अॅप, जिओच्या संकेतस्थळावर आणि अधिकृत किरकोळ दुकानांमध्ये उपलब्ध झाले आहेत.
या सर्व पासमध्ये हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड ५जी, १५ प्रीमियम ओटीटी अॅप्स आणि जिओटीव्हीवरील १ हजारांहून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेल्सचा समावेश आहे. मात्र, या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाकडे एक वर्षाच्या वैधतेचा सक्रिय बेस प्लॅन असणं आवश्यक आहे. केवळ व्हॉइस कॉलिंगसाठी असलेल्या प्लॅनवर ही सुविधा उपलब्ध होणार नाही.
नवीन दीर्घकालीन पासमुळे ग्राहकांची चांगली बचत होणार आहे. ८४ दिवसांसाठी पूर्वी २०० रुपयांचे तीन पास घ्यावे लागत असल्याने ६०० रुपये खर्च होत होते. आता हाच कालावधी ५५० रुपयांत मिळणार असल्याने ५० रुपयांची बचत होईल. त्याचप्रमाणे वर्षभरासाठी २०० रुपयांचे १२ पास घेतल्यास २ हजार ४०० रुपये खर्च होत होते. आता वार्षिक पास २ हजार रुपयांत मिळणार असल्याने ४०० रुपयांची बचत होणार आहे.
डेटाच्या बाबतीतही ग्राहकांना अधिक सुविधा मिळणार आहेत. २८ दिवसांच्या पासमध्ये ३० जीबी, ८४ दिवसांच्या पासमध्ये ९० जीबी, तर वार्षिक पासमध्ये ३६५ जीबी हाय-स्पीड डेटा मिळेल. यासोबत अनलिमिटेड ५जी डेटाची सुविधाही देण्यात आली आहे.
ओटीटी सुविधांमध्ये यूट्यूब प्रीमियम, जिओहॉटस्टार, अॅमेझॉन प्राइम, सोनीलिव्ह, झी५, लायन्सगेट प्ले, डिस्कव्हरी प्लस, सन एनएक्सटी, फॅनकोड, होईचोई, चौपाल, प्लॅनेट मराठी यांसह १५ प्रीमियम अॅप्सचा समावेश आहे. याशिवाय जिओटीव्हीवर १ हजारांहून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेल्स उपलब्ध होणार आहेत. कंपनीच्या मते, या पॅकेजमधून ग्राहकांना दर महिन्याला १ हजार ५०० रुपयांहून अधिक किमतीच्या मनोरंजनाचा लाभ मिळू शकतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule