लोहगाव विमानतळाभोवती कचरा, ड्रोनचा धोका; बर्ड हिटिंगची चिंता वाढली
पुणे, 09 ऑगस्ट (हिं.स.)।भारतातील महत्त्वाच्या लष्करी विमानतळांपैकी एक असलेल्या लोहगाव विमानतळाभोवती कचरा आणि विनापरवानगी ड्रोन उडविण्याच्या घटनांमुळे सुरक्षेचे आव्हान वाढले आहे. परिसरात वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने पक्ष्यांचा वावर वाढला असून, त्य
Pune Air port


पुणे, 09 ऑगस्ट (हिं.स.)।भारतातील महत्त्वाच्या लष्करी विमानतळांपैकी एक असलेल्या लोहगाव विमानतळाभोवती कचरा आणि विनापरवानगी ड्रोन उडविण्याच्या घटनांमुळे सुरक्षेचे आव्हान वाढले आहे. परिसरात वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने पक्ष्यांचा वावर वाढला असून, त्याचा थेट परिणाम विमानांच्या उड्डाण आणि उतरण्याच्या प्रक्रियेवर होण्याची शक्यता आहे.विमानतळ परिसरात घार, ससाणा, कबुतर, पोपट यांसह सुमारे २० प्रकारच्या पक्ष्यांचा वावर वाढल्याचे हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे विमानांना बर्ड हिट होण्याचा धोका वाढला आहे. हा धोका टाळण्यासाठी भारतीय हवाई दलाला विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या लागत आहेत.

भारतीय हवाई दलाच्या वतीने आयोजित अनौपचारिक भेटीदरम्यान ही माहिती समोर आली. विमानतळाभोवती वाढते नागरीकरण आणि कचऱ्याची समस्या यामुळे पक्ष्यांची संख्या वाढत असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. पक्षी विमानाच्या मार्गात आल्यास त्याचा उड्डाण आणि लँडिंगवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी हवाई दलाला सातत्याने दक्षता घ्यावी लागत आहे.दरम्यान, विमानतळाच्या आजूबाजूच्या नागरी भागातून विनापरवानगी ड्रोन उडविण्याच्या घटनाही सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक ठरत आहेत. लष्करी विमानतळाच्या परिसरात अनधिकृतपणे ड्रोन उडविल्याने विमानांच्या सुरक्षिततेबरोबरच संवेदनशील लष्करी क्षेत्राच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होतो.

लोहगाव विमानतळावरून दररोज होणाऱ्या नागरी उड्डाणांची संख्या सुमारे २४० वर पोहोचली असून, महिन्याला हा आकडा सुमारे १,७०० पर्यंत जात असल्याचे सांगण्यात आले. उड्डाणांची वाढती संख्या आणि विमानतळाभोवती वाढणारे नागरीकरण या पार्श्वभूमीवर पक्ष्यांचा धोका अधिक गंभीर झाला आहे.पक्ष्यांवर लक्ष ठेवण्यासाठी हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात वेळ द्यावा लागत असल्याची खंत अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

विमानांच्या वाढत्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर कचऱ्याची नियमित विल्हेवाट, पक्ष्यांना आकर्षित करणारे घटक दूर करणे आणि विमानतळ परिसरातील विनापरवानगी ड्रोन उड्डाणांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande