वनाज-रामवाडी विस्तारित मार्गासह नळ स्टॉप-वारजे-माणिकबाग मेट्रोला विलंब
पुणे, 09 ऑगस्ट (हिं.स.)।महामेट्रोच्या वनाज-रामवाडी या विस्तारित मार्गासह नळ स्टॉप-वारजे-माणिकबाग हा नवा मेट्रो मार्ग विकसित करण्यात येणार आहे. या मार्गाला केंद्र सरकारची मान्यता मिळाली असून महामेट्रोने निविदा प्रक्रियाही पूर्ण केली आहे. मात्र, मेट्
Metro Train


पुणे, 09 ऑगस्ट (हिं.स.)।महामेट्रोच्या वनाज-रामवाडी या विस्तारित मार्गासह नळ स्टॉप-वारजे-माणिकबाग हा नवा मेट्रो मार्ग विकसित करण्यात येणार आहे. या मार्गाला केंद्र सरकारची मान्यता मिळाली असून महामेट्रोने निविदा प्रक्रियाही पूर्ण केली आहे. मात्र, मेट्रो मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने प्रस्तावित केलेल्या दुहेरी उड्डाणपुलांबाबत अंतिम निर्णय होत नसल्याने या प्रकल्पाचे काम गेल्या सहा महिन्यांपासून रखडले आहे.

मेट्रो मार्गाबरोबरच उड्डाणपुलांच्या उभारणीबाबत महापालिकेने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी महामेट्रोकडून सातत्याने करण्यात येत आहे. निर्णयास विलंब होत राहिल्यास प्रकल्पाच्या खर्चात वाढ होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यातच महापालिकेच्या प्रस्तावित उड्डाणपुलांच्या आराखड्यात लोकप्रतिनिधींकडून वारंवार बदल सुचविले जात असल्याने प्रशासनासमोरही अडचणी निर्माण झाल्या आहेत.दरम्यान, महामेट्रोकडून वनाज ते चांदणी चौक या सुमारे दीड किलोमीटरच्या मार्गाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. या मार्गावर दोन स्थानके प्रस्तावित असून पौड रस्त्यावरून हा मार्ग चांदणी चौकापर्यंत जाणार आहे. या भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेने मेट्रो मार्गासोबतच वनाजपासून थेट चांदणी चौकापर्यंत उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन केले आहे.मात्र, या उड्डाणपुलाच्या आराखड्यात गेल्या सहा महिन्यांत तब्बल तीन वेळा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे पुलाचा अंतिम आराखडा निश्चित करण्यास विलंब होत आहे. आराखडा अंतिम करण्याबरोबरच उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी लागणाऱ्या खर्चाबाबतही निर्णय घेणे आवश्यक आहे.उड्डाणपुलाचा आराखडा आणि खर्चाचा निर्णय लवकर झाल्यास मेट्रोच्या विस्तारित मार्गाचे काम मार्गी लागण्याची शक्यता आहे. मात्र, महापालिकेच्या निर्णयाला आणखी विलंब झाल्यास मेट्रो प्रकल्पाच्या वेळापत्रकावर तसेच एकूण खर्चावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande