
पुणे, 09 ऑगस्ट (हिं.स.)।पुणेकरांच्या वाहनांची ओळख बनलेली ‘एमएच १२’ ही वाहन नोंदणी सिरीज आता ऐतिहासिक बदलाच्या उंबरठ्यावर आली आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात सध्या सुरू असलेली दोन अक्षरांची अंतिम मालिका म्हणजे ‘एमएच १२ झेडझेड’ येत्या दोन ते तीन आठवड्यांत संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यानंतर वाहनांना कोणत्या स्वरूपातील नोंदणी क्रमांक दिला जाणार, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
‘एमएच १२’ ही ओळख कायम ठेवून त्यापुढे ‘एमएच १२ १ए’ अशा स्वरूपाची नवीन मालिका सुरू करण्याची शक्यता आहे. याबाबत पुणे आरटीओकडून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. शासनाच्या मान्यतेनंतर नवीन पद्धतीने वाहन नोंदणी सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.पुणे आरटीओमध्ये दोन अक्षरांची वाहन नोंदणी सिरीज सुमारे १९९२ मध्ये सुरू झाली. त्यानंतर AA ते ZZ या संपूर्ण मालिकेतील क्रमांक देण्यात आले. ही मालिका पूर्ण होण्यासाठी तब्बल ३४ वर्षांचा कालावधी (१९९२ ते २०२६) लागला आहे.आरटीओमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र नोंदणी सिरीज चालविण्यात येतात. दुचाकी वाहनांसाठी ZY सिरीज ऑगस्ट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात संपली असून, आता अंतिम ZZ सिरीज सुरू आहे. ही सिरीजही लवकरच संपण्याचा अंदाज आहे.दरम्यान, चारचाकी वाहनांसाठी सध्या ZW सिरीज सुरू असून ती पुढील दोन महिन्यांत संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी पुढील टप्प्यात कोणती पद्धत लागू केली जाणार, याबाबत आरटीओकडून शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु