
सोलापूर, 09 ऑगस्ट (हिं.स.)।
अनगर व परिसरातील दहा गावांतील शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांती घडविणाऱ्या आष्टी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक-३ (अनगर व दहा गावे पाणीपुरवठा योजना)च्या आरंभ प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या योजनेसाठी ११७ कोटी ७६ लाख रुपयांची प्राथमिक निविदा प्रक्रिया सुरू झाली असून, येत्या २५ तारखेला ही निविदा उघडण्यात येणार आहे. या योजनेमुळे अनगरसह परिसरातील दहा गावांमधील सुमारे ३ हजार ९०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याची माहिती माजी आमदार राजन पाटील यांनी दिली.
अनगर आणि परिसर हा कायम दुष्काळी म्हणून ओळखला जातो. पावसाळ्यातही या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्यामुळे या भागात बागायती करणे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरते. परिसरातील जमीन काळी व कसदार असून, केवळ पाण्याअभावी शेतकऱ्यांना पावसाच्या भरवशावर शेती करावी लागते.ही समस्या लक्षात घेऊन माजी आमदार राजन पाटील यांनी अनगर व दहा गावे पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार केला. त्यावेळी माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्याकडे जलसंपदा खाते असल्याने हा प्रस्ताव त्यांच्या विभागाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता.
मोहोळ विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच माजी आमदार राजन पाटील आणि माजी आमदार यशवंत माने यांनी पाठपुरावा करून स्व. अजित पवार यांच्या दालनात योजनेला मंजुरी मिळवून घेतली.त्यानंतर माजी आमदार राजन पाटील आणि माजी आमदार यशवंत माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यापूर्वीपासूनच राजन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे या योजनेसाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस आणि जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी योजना कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्याचा विश्वास दिल्याचे पाटील यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड