
परभणी, 09 ऑगस्ट (हिं.स.)।
मानवत येथून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची साठवणूक उघडकीस आली होती. या प्रकरणी मानवत पोलिसांत एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आता मानवत पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातून सहा आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
मानवत ड्रग्स प्रकरणी पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी, सखोल तपास करून साखळी निष्पन्न करण्याचे आदेश मानवत पोलीस आणि स्थानिक गुन्हा शाखेला दिले. यावरून स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या नेतृत्वात तसेच मानवत पोलिसांंतील पोलिस अधिकारी आणि अंमलदारांचे दोन पथक निर्माण करण्यात आले. या पथकाला अमली पदार्थ विक्री व पुरवठा करणाऱ्या साखळीतील काही आरोपींची खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचे पथक रवाना करण्यात आले. या कारवाईत मोसिन सलीम मिर्झा (वय ३०) रा. मोमीन गल्ली कळंब जि. धाराशिव, अक्रम मोमीन (वय ३०) रा. बौद्धनगर लातूर, बाबा मोमीन रफिक (वय ३२) रा. लातूर, सय्यद समीर सय्यद शब्बीर रा. भोईगल्ली परळी वैजनाथ जि. बीड, शेख सलमान शेख खय्युम रा. कोकरमोहल्ला परळी वैजनाथ जि. बीड आणि अयान नासिर पठाण रा. बरकतनगर परळी वैजनाथ जि. बीड अशा सहा आरोपींना अटक करण्यात आली. या आरोपींना न्यायालयापुढे सादर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis