
अमरावती, 09 ऑगस्ट (हिं.स.)
जुलैमध्ये विक्रमी गर्दी; नगरपालिकेच्या तिजोरीत २३ लाखांहून अधिक महसूल
विदर्भाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या चिखलदऱ्यात यंदाच्या पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या कालावधीत तब्बल १ लाख ३७ हजार पर्यटकांनी चिखलदऱ्याला भेट दिल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे जुलै महिन्यात पावसाळी वातावरणाचा आनंद घेण्यासाठी लाखापेक्षा अधिक पर्यटकांनी चिखलदऱ्याची वाट धरली.चिखलदऱ्यातील हिरवाई, धबधबे, डोंगरदऱ्या, आल्हाददायक वातावरण आणि पावसाळ्यात निसर्गाचे बदलणारे रूप पर्यटकांना आकर्षित करत आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळी पर्यटन हंगामात चिखलदऱ्यातील विविध पर्यटनस्थळांवर विकेंडला मोठी गर्दी होत आहे.एप्रिलपासून सुरू झालेल्या पर्यटन हंगामाला जून-जुलैमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. जुलै महिन्यात तर पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. शनिवार-रविवारसह सुटीच्या दिवशी चिखलदऱ्यातील प्रमुख पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजून जात असल्याचे चित्र आहे.पर्यटकांच्या वाढत्या संख्येचा थेट फायदा स्थानिक अर्थव्यवस्थेलाही होत आहे. हॉटेल, लॉजिंग, खाद्यपदार्थांचे स्टॉल, स्थानिक वाहतूक तसेच विविध पर्यटन व्यवसायांना चांगला रोजगार मिळत आहे. याशिवाय चिखलदरा नगरपालिकेच्या महसुलातही वाढ झाली असून, एप्रिल ते जुलै या कालावधीत नगरपालिकेच्या तिजोरीत २३ लाखांहून अधिक रुपयांचा महसूल जमा झाला आहे.पावसाळ्यात चिखलदऱ्याचे सौंदर्य अधिक खुलून येत असल्याने आगामी काळातही पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटनस्थळांवरील स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, पार्किंग आणि सुरक्षेच्या उपाययोजनांकडे प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.दरम्यान, पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे आणि निसर्ग संवर्धनाला हातभार लावावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी