'राष्ट्रभक्तिका चिरंतन प्रवाह’ला नाशिककरांचा अभूतपूर्व प्रतिसाद
नाशिक, 09 ऑगस्ट (हिं.स.)। क्रांती दिनाचे औचित्य साधत ‘आकार’ पुणे या सांस्कृतिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘राष्ट्रभक्तिका चिरंतन प्रवाह’ हा भव्य सांगीतिक दृक्-श्राव्य अविष्कार नाशिककरांच्या उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व प्रतिसादात पार पडला.
Nashik residents' unprecedented


Nashik residents' unprecedented


नाशिक, 09 ऑगस्ट (हिं.स.)।

क्रांती दिनाचे औचित्य साधत ‘आकार’ पुणे या सांस्कृतिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘राष्ट्रभक्तिका चिरंतन प्रवाह’ हा भव्य सांगीतिक दृक्-श्राव्य अविष्कार नाशिककरांच्या उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व प्रतिसादात पार पडला. रविवार, ९ ऑगस्ट रोजी गुरु दक्षिणा सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमातून राष्ट्रभक्ती, राष्ट्रजागृती आणि समाजनिर्मितीचा प्रेरणादायी प्रवाह रसिकांसमोर उलगडला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त तसेच राष्ट्र सेविका समितीच्या नवदशकपूर्तीच्या निमित्ताने संघ आणि समितीने समाज उभारणी व राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात दिलेल्या योगदानाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

८५ कलाकारांची सांगीतिक मानवंदना

‘राष्ट्रभक्तिका चिरंतन प्रवाह’ या कार्यक्रमात तब्बल ८५ कलाकार आणि वादकांनी सहभाग घेतला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्र सेविका समितीमध्ये गायली जाणारी विविध गीते एकल तसेच समूहस्वरूपात सादर करण्यात आली.

दोन्ही संस्थांच्या प्रदीर्घ वाटचालीचा आढावा घेणाऱ्या प्रभावी निवेदनाची सर्व गीतांना उत्तम जोड लाभली. संहिता लेखन आणि निवेदनाच्या माध्यमातून सुप्रिया गोडबोले यांनी संघ आणि समितीचा इतिहास तसेच त्यांच्या कार्याचा प्रवास प्रभावीपणे रसिकांसमोर मांडला.

समाजरथाची दोन चाके असलेल्या स्त्री आणि पुरुष यांच्या माध्यमातून व्यक्तिनिर्माण आणि चरित्रनिर्माणाचे कार्य संघ आणि समिती समांतरपणे कसे करीत आहेत, याचा सांगीतिक आणि दृक्-श्राव्य आढावा या कार्यक्रमातून घेण्यात आला. त्यामुळे कार्यक्रमाला केवळ मनोरंजनाची नव्हे, तर राष्ट्रजागृती आणि प्रेरणेचीही प्रभावी किनार लाभली.

या कार्यक्रमाची संकल्पना चित्रा देशपांडे, सुखदा खांडकेकर आणि श्रीकांत कोठे यांची होती. संहिता लेखन व निवेदन सुप्रिया गोडबोले यांनी केले, तर अभिनेते अभिजित खांडकेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पेश कुलकर्णी यांनी केले.

कार्यक्रमास जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, आमदार सीमाताई हिरे, आमदार देवयानीताई फरांदे, नाशिक महानगरपालिकेच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके, भाजप प्रवक्ते लक्ष्मणजी सावजी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाशिक शहर कार्यवाह सुहासजी वैद्य यांच्यासह संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच स्वातंत्र्यलक्ष्मी राणी लक्ष्मीबाई स्मारक समितीच्या उपाध्यक्षा शुभांगीताई कुलकर्णी आणि समितीचे पदाधिकारी, जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीशजी मदाने यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

अशा कार्यक्रमांची उत्तर महाराष्ट्रात व्यापक गरज – गिरीश महाजन

यावेळी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी ‘राष्ट्रभक्तिका चिरंतन प्रवाह’ या कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्र सेविका समितीने सुमारे शंभर वर्षांच्या कालखंडात सातत्याने केलेल्या राष्ट्रजागृतीच्या कार्याची आजच्या काळातही मोठी गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

संघ आणि समितीच्या कार्याचा सांगीतिक माध्यमातून घेतलेला हा आढावा अत्यंत प्रभावी असून, अशा प्रकारचे कार्यक्रम उत्तर महाराष्ट्रातील विविध ठिकाणी आयोजित व्हावेत, यासाठी आपण स्वतः आवर्जून सहकार्य करू, असे आश्वासनही मंत्री महाजन यांनी यावेळी दिले.

स्वतंत्र सांस्कृतिक संस्थेकडून राष्ट्रकार्याला सांगीतिक मानवंदना

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्र सेविका समितीच्या परिवाराबाहेरील स्वतंत्र सांस्कृतिक संस्थेने त्यांच्या राष्ट्रनिर्माणाच्या कार्याची दखल घेत अशा प्रकारचा भव्य सांगीतिक कार्यक्रम सादर करण्याची नाशिकमधील ही पहिलीच वेळ असल्याचे आयोजकांनी सांगितले. त्यामुळे या उपक्रमाचे विशेष महत्त्व असून, नाशिकच्या रसिक प्रेक्षकांनी कार्यक्रमाला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि भरभरून केलेले कौतुक हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande