
सोलापूर, 09 ऑगस्ट (हिं.स.)।
पंढरपूरची आषाढी यात्रा लाखो भाविकांच्या श्रद्धेचा आणि भक्तीचा सोहळा असताना, यंदाच्या यात्रेचे नियोजन सुरळीत, शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पडल्याबद्दल पंचायत राज व ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांचे अभिनंदन करण्यात आले. अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांनी येथील गोरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी राजा माने यांच्या हस्ते मंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार करण्यात आला.पंढरपूर यात्रेदरम्यान राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक पंढरपुरात दाखल झाले होते. या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था, भाविकांची सुरक्षितता, निवास, पाणी, आरोग्य आणि अन्य मूलभूत सुविधांचे नियोजन करणे प्रशासनासमोर मोठे आव्हान होते. मात्र, विविध विभागांमध्ये योग्य समन्वय ठेवून यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यात आली. भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देतानाच सुरक्षितता आणि व्यवस्थापनाला प्राधान्य देण्यात आल्याबद्दल यावेळी समाधान व्यक्त करण्यात आले.या सदिच्छा भेटीदरम्यान राज्यातील विविध विकासकामे, ग्रामविकासाच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाला मिळणारी गती तसेच डिजिटल माध्यम क्षेत्रातील पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड