
पुणे, 09 ऑगस्ट (हिं.स.)। पुणे विमानतळ आणि हवाई दलाच्या परिसराभोवती शहराचा विस्तार झपाट्याने होत असून, या भागात इमारती तसेच व्यावसायिक बांधकामांचे प्रमाण वाढत आहे. हवाई सुरक्षेच्या दृष्टीने बांधकामांसाठी आवश्यक असलेल्या ना-हरकत प्रमाणपत्रासाठी (एनओसी) दाखल होणाऱ्या अर्जांची संख्या गेल्या पाच वर्षांत सातत्याने वाढली आहे. २०२० मध्ये एनओसीसाठी १ हजार ६२ अर्ज दाखल झाले होते. २०२५ मध्ये ही संख्या वाढून १ हजार ४०८ वर पोहोचली.विमानतळ परिसरात बांधकाम करताना इमारतीची उंची, बांधकामाचे ठिकाण, विमानांच्या उड्डाण मार्गापासूनचे अंतर यांसह विविध तांत्रिक बाबींचा विचार केला जातो. त्यामुळे संबंधित यंत्रणांकडून आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असते.गेल्या काही वर्षांत एनओसीसाठी दाखल होणाऱ्या अर्जांची वाढती संख्या विमानतळ आणि हवाई दलाच्या परिसरालगत नागरीकरणाचा वेग वाढल्याचे दर्शविते. अधिकृत बांधकामांसोबतच नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात येणाऱ्या अनधिकृत बांधकामांमुळे हवाई सुरक्षेचे आव्हानही वाढत आहे.विमानांच्या उड्डाण आणि लँडिंगच्या मार्गात अडथळा निर्माण होऊ नये, तसेच विमानतळाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी बांधकामांवरील उंचीची मर्यादा आणि इतर नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर नियमबाह्य बांधकामांवर नियंत्रण ठेवणे आणि एनओसी प्रक्रियेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आव्हान संबंधित यंत्रणांसमोर आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु