पुणे विमानतळावर जुने टर्मिनल पुन्हा सेवेत येण्याच्या मार्गावर
पुणे, 09 ऑगस्ट (हिं.स.)।ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी (बीसीएएस)च्या पथकाने नुकतीच पुणे विमानतळावरील जुन्या टर्मिनलची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील सुरक्षा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. या तपासणीनंतर जुन्या टर्मिनलला प्रवासी उड्डाणांसाठी लवकर
Pune Air port


पुणे, 09 ऑगस्ट (हिं.स.)।ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी (बीसीएएस)च्या पथकाने नुकतीच पुणे विमानतळावरील जुन्या टर्मिनलची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील सुरक्षा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. या तपासणीनंतर जुन्या टर्मिनलला प्रवासी उड्डाणांसाठी लवकरच हिरवा कंदील मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनल सुरू झाल्यानंतर जुन्या टर्मिनल इमारतीच्या नूतनीकरणाचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आले होते. हे काम आता पूर्ण झाले असून, सुरक्षा व्यवस्थेची अंतिम मान्यता मिळाल्यानंतर या टर्मिनलवरून प्रत्यक्ष प्रवासी हाताळणी सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.जुने टर्मिनल पुन्हा सेवेत आल्यास विमानतळाची प्रवासी हाताळणी क्षमता वाढणार आहे. विशेषतः पिक अवर, सणासुदीचा काळ आणि सुट्ट्यांच्या कालावधीत प्रवाशांची होणारी गर्दी कमी होण्यास मदत होणार असून, सुरक्षा तपासणीसाठीही प्रवाशांना अधिक सुविधा मिळण्याची शक्यता आहे.याशिवाय नवीन आणि जुन्या टर्मिनलला अंतर्गत मार्गाने जोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना दोन्ही टर्मिनलमध्ये सहजपणे ये-जा करता येणार आहे. यामुळे विमानतळावरील प्रवासी व्यवस्थापन अधिक सुलभ होण्यास मदत होईल. बीसीएएसकडून सुरक्षा व्यवस्थेची अंतिम मान्यता मिळाल्यानंतर जुन्या टर्मिनलवरून प्रवासी सेवा सुरू करण्यात येणार आहे. दोन्ही टर्मिनल कार्यान्वित झाल्यानंतर पुणे विमानतळाच्या पायाभूत सुविधांना आणखी बळकटी मिळणार असून, वाढत्या प्रवासी संख्येचा भार हाताळण्यासही मदत होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande