परभणी जिल्हा एसआयआर मध्ये राज्यात दुसरा
परभणी, 09 ऑगस्ट (हिं.स.)।भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमात परभणी जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. विशेष सखोल पुनरिक्षण प्रक्रियेतील संगणकीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण करत परभणी जिल
परभणी जिल्हा एसआयआर मध्ये  राज्यात दुसरा -१०० टक्के एसआयआर संगणकीकरण


परभणी, 09 ऑगस्ट (हिं.स.)।भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमात परभणी जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. विशेष सखोल पुनरिक्षण प्रक्रियेतील संगणकीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण करत परभणी जिल्ह्याने मराठवाडा विभागात प्रथम, तर राज्यात एकूण कामगिरीत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, परभणी जिल्ह्यात महानगरपालिका क्षेत्राचा समावेश असतानाही नागरी भागाचा विचार करता परभणी जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर राहिला आहे. राज्यातील एकूण क्रमवारीत रत्नागिरी जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळविला असून, रत्नागिरी हा प्रामुख्याने ग्रामीण स्वरूपाचा जिल्हा आहे. पावसाळ्याच्या प्रतिकूल परिस्थितीतही अधिकारी, कर्मचारी आणि बीएलओ यांच्या अथक परिश्रमातून परभणीने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे.या यशामागे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे प्रभावी नियोजन, सातत्यपूर्ण पर्यवेक्षण, नियमित आढावा आणि मार्गदर्शन निर्णायक ठरले. जिल्ह्यातील एसआयआर प्रक्रियेला अपेक्षित गती मिळावी आणि निर्धारित उद्दिष्ट वेळेत साध्य व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी यांनी दररोज सायंकाळी ७ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांचा वैयक्तिकरीत्या आढावा घेतला. तर उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार यांनी प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन आणि प्रक्रियेच्या बारकाव्यांबाबत अधिकारी - कर्मचाऱ्यांना आवश्यक ते मार्गदर्शन केले. एसआयआर प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या तांत्रिक बाबींचे निराकरण, क्षेत्रीय यंत्रणेशी सातत्यपूर्ण समन्वय आणि कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात त्यांच्या मार्गदर्शनाची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. तसेत क्षेत्रीय स्तरावर उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी उदयसिंह भोसले (परभणी), शैलेश लाहोटी (सेलू), संगीता चव्हाण (पाथरी) आणि जीवराज डापकर (गंगाखेड) यांनी आपल्या कार्यक्षेत्रात सूक्ष्म नियोजन, नियमित आढावा आणि प्रभावी समन्वयाच्या माध्यमातून एसआयआर कामाला गती दिली. विधानसभा मतदारसंघनिहाय प्रलंबित बाबींवर विशेष लक्ष केंद्रित केले.

-पावसातही थांबले नाही पाऊल..एसआयआर प्रक्रियेच्या या यशात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली ती बीएलओ आणि क्षेत्रीय स्तरावरील कर्मचाऱ्यांनी. पावसाळ्याचे दिवस, ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थिती, वाहतुकीच्या अडचणी आणि नागरिकांपर्यंत पोहोचण्यातील आव्हाने असतानाही बीएलओ यांनी घरोघरी भेटी देत, नागरिकांशी संवाद साधत आणि आवश्यक माहिती संकलित केली. मंडळाधिकारी, तलाठी, कोतवाल, पोलीस पाटील, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका तसेच इतर विभागांतील क्षेत्रीय कर्मचारी यांनीही या मोहिमेत मोलाची साथ दिली. तसेच तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच तहसील कार्यालयातील निवडणूक विषयक कामकाजाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही नियमित प्रशासकीय कामकाजासोबत एसआयआर प्रक्रियेला प्राधान्य दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande