
अमरावती, 09 ऑगस्ट (हिं.स.)
वातावरणीय बदलावर मात करण्यासाठी शेतकऱ्याचा सहा एकरात नवीन प्रयोग
वातावरणीय बदल, अवेळी पाऊस आणि वाढत्या रोगराईमुळे संत्रा-मोसंबी पिकांच्या उत्पादनावर परिणाम होत असताना तालुक्यातील तिवसाघाट येथील प्रयोगशील संत्रा उत्पादक व उद्यानपंडित पुरस्कारप्राप्त शेतकरी उद्धव फुटाणे यांनी विदेशी प्रजातींच्या संत्रा-मोसंबी कलमांची प्रायोगिक तत्त्वावर लागवड केली आहे. उद्धव नर्सरीच्या माध्यमातून गेल्या ३० वर्षांपासून लिंबूवर्गीय पिकांच्या कलमांवर विविध प्रयोग करणाऱ्या फुटाणे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा प्रयोग हाती घेतला आहे. शेती व्यवसायावर वातावरणीय बदल व अस्मानी संकटांचे परिणाम वाढत असल्याने संत्रा-मोसंबी पिकाची शाश्वती राहिलेली नाही. अवेळी पाऊस, रोगराई आणि बदलत्या हवामानामुळे उत्पादनात होणारी घट लक्षात घेता शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करण्यास सुरवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर फुटाणे यांनी युरोपातील विविध देशांसह अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथून संत्रा-मोसंबीच्या विदेशी प्रजाती आणून त्यांची लागवड केली आहे. सुमारे साडेसहा एकर क्षेत्रात एकरी ३० ते ४० टन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवून एकूण १२३९ संत्रा-मोसंबी कलमांची तांत्रिक पद्धतीने लागवड करण्यात आली आहे. कलमांची लागवड १२ बाय २० फूट अंतरावर करण्यात आली असून, चार फूट उंच व आठ फूट रुंद बेड तयार करून त्यावर दर्जेदार मल्चिंग शीटचा वापर करण्यात आला आहे. ठिबक सिंचनासोबतच खतांचा पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली आहे. तसेच अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी ड्रेनेजची व्यवस्था करण्यात आली आहे. या बागेत संत्र्याच्या चार आणि मोसंबीच्या चार विदेशी प्रजातींच्या कलमांची प्रायोगिक तत्त्वावर लागवड करण्यात आली आहे. वातावरणीय बदलाच्या परिस्थितीत या प्रजातींची वाढ, उत्पादन क्षमता व रोगप्रतीकारकता यांचा अभ्यास करून त्यातून संत्रा उत्पादकांना पर्यायी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे. फुटाणे यांच्या या प्रयोगाकडे तालुक्यातील संत्रा उत्पादकांचे लक्ष लागले आहे.
--------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी