
परभणी, 09 ऑगस्ट (हिं.स.)।
पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या संकल्पनेतून जिल्हाभरात ऑपरेशन जरब ही विशेष प्रतिबंधात्मक मोहीम पोलिसांच्या वतीने राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत दोनशेहून अधिक सराईत आरोपींना जिल्हाभरातील पोलीस ठाण्यात बोलवून कायदा पालनाची कडक तंबी देण्यात आली आहे.
परभणी जिल्ह्यात नागरिकांना सुरक्षित निर्भय आणि कायद्याचे अधिराज्य असलेले वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन जरब ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत समाजामध्ये दहशत निर्माण करणारे, दादागिरी करणारे, वारंवार गुन्हे करणारे, सराईत हिस्ट्रीसीटर, तडीपार, जामीनावर मुक्त असलेले गंभीर गुन्ह्यातील आरोपी आणि स्थानिक पातळीवर कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण करण्याची शक्यता असलेल्या व्यक्तींची पोलीस ठाणेनिहाय ओळख पटविण्यात आली आहे. या मोहिमेत आतापर्यंत संशयित आणि सराईत २०० हून अधिक आरोपींना संबंधित पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची सखोल चौकशी करण्यात आली आहे. तसेच त्यांना कायद्याचे पालन करण्याबाबत कठोर तंबी देण्यात आली आहे. मोहिमेंतर्गत शनिवारी स्थानिक गुन्हे शाखा आणि जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या वतीने ९४ सराईत व संशयित आरोपींना वर्तणुकीत सुधारणा आणण्याबाबत तंबी देण्यात आली आहे.
ऑपरेशन जरब ही केवळ एकादिवशीय मोहीम नसून सराईत गुन्हेगारांवर सातत्याने वचक ठेवण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ करण्यासाठी मोहिम नियमितपणे राबविण्यात येणार आहे. समाजामध्ये कायद्याचे राज्य अबाधित ठेवण्यासाठी आवश्यकत त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभाविपणे सुरू राहतील.
-पंकज कुमावत,
पोलीस अधीक्षक
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis