तब्बल आठ दिवसानंतर अमरावती शहरात पावसाची हजेरी
अमरावती, 09 ऑगस्ट (हिं.स.)। गेल्या आठ दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने हजेरी लावली. तासभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भाग जलमय झाले होते. तर ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचले होते. अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना मनस्ता
तब्बल आठ दिवसानंतर शहरात पावसाची हजेरी


अमरावती, 09 ऑगस्ट (हिं.स.)। गेल्या आठ दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने हजेरी लावली. तासभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भाग जलमय झाले होते. तर ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचले होते. अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. दडी मारलेल्या पावसाच्या आगमनामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली. यंदा पावसाने जिल्ह्याकडे चांगलीच पाठ फिरवली आहे. पावसाची प्रतीक्षा करणार्या शेतकऱ्यांनी पेरण्या अतिशय विलंबाने केल्या. सलग काही दिवस जिल्ह्यात पावसाचा मुक्काम होता.

पिकांची अवस्थासुद्धा चांगली होती. परंतु मध्यंतरी पावसाने दडी मारली. बरेच दिवस पडलेला पावसाचा खंड शेतकऱ्यांसाठी अतिशय चिंताजनक होता. मध्यंतरी दहा ते १५ दिवस पाऊस न आल्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच चिंता वाढली होती. यंदा पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, जुलै महिन्याच्या शेवटी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील ९८ महसूली मंडळात अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली. शेकडो हेक्टर शेती तसेच पिके पाण्याखाली गेले. साडेतीन हजार हेक्टरहून अधिक शेतीक्षेत्र खरडून गेले होते. विशेष म्हणजे अवघ्या २४ तासांत १३५ मिमी पाऊस कोसळल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तद्नंतर वातावरणात पुन्हा बदल झाला. पावसाने विश्रांती घेतल्याने उन्हाची तीव्रता वाढली होती. मागिल आठ दिवसानंतर शनिवारी दुपारी अचानक ढगाळी वातावरण निर्माण झाले. तर दुपारी तीन वाजताच्या सुमारास रिमझिम पावसाला सुरवात झाली. त्यानंतर तासभर मुसळधार पाऊस कोसळला. अचानक कोसळलेल्या पावसामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांची तारांबळ उडाली होती.

‘सोयाबीन‘मुळे वाढले शेतकऱ्यांचे ‘टेन्शन’

अनियमित पावसामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. असे असताना यंदा सर्वसाधारण नव्हे, तर चक्क नामांकित कंपन्यांचे बियाणे निकृष्ट दर्जाचे निघाले आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णता खचला आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे केल्या आहेत. कृषी विभागाने बहुतांश शेतीचे स्पॉट पंचनामे केले असून, थेट कंपनीविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हे सुद्धा दाखल केले आहे. असे असलेतरी यंदाचा हंगाम शेतकऱ्यांच्या हातून निसटल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande