


रायगड, 09 ऑगस्ट (हिं.स.)। : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यात माणगाव येथील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे फीत कापून उद्घाटन केले. यावेळी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उत्साहात बाईक रॅली काढून राज ठाकरे यांचे स्वागत केले. या दौऱ्यामुळे माणगाव परिसरात मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. बाईक रॅलीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. कार्यालयाच्या उद्घाटनानंतर राज ठाकरे यांनी कार्यालयातील उद्घाटनाची आठवण म्हणून स्वाक्षरी केली. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी संवाद साधत संघटनात्मक कामाबाबत चर्चा केली.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव-इंदापूर बायपासच्या रखडलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. गेल्या सुमारे १४ वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम विविध कारणांमुळे रखडले असून, त्याचा मोठा फटका कोकणवासीयांना बसत आहे. महामार्गावरील अपूर्ण कामे, खड्डे, वाहतूक कोंडी आणि धुळीमुळे वाहनचालक तसेच प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
माणगाव बायपासची पाहणी करताना राज ठाकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाची सद्यस्थिती आणि रखडण्याची कारणे जाणून घेतली. महामार्गाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. कोकणातील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाशी संबंधित असलेल्या या महत्त्वाच्या प्रश्नाकडे शासन आणि प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.
राज ठाकरे यांच्या रायगड दौऱ्यात पक्ष संघटन मजबूत करण्यावरही भर देण्यात आला. मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनामुळे माणगावमध्ये मनसेच्या आगामी राजकीय वाटचालीला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या दौऱ्यामुळे रायगडच्या राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)