विना निविदाच झाले महापौर कक्षाचे नूतनीकरण, अमरावती महापालिकेत संशयकल्लोळ
अमरावती, 09 ऑगस्ट (हिं.स.)। निविदाप्रक्रिया न करताच महापौर कक्षाचे करण्यात आलेले नूतनीकरण आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. नूतनीकरणासाठी नेमके किती रुपये खर्च करण्यात आले, याचा हिशेब मनपातील बांधकाम विभागाकडे नसल्याने व त्यास कुणाची मंजुरी घेण्य
विना निविदाच झाले महापौर कक्षाचे नूतनीकरण महापालिकेत संशयकल्लोळला सुरुवात


अमरावती, 09 ऑगस्ट (हिं.स.)।

निविदाप्रक्रिया न करताच महापौर कक्षाचे करण्यात आलेले नूतनीकरण आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. नूतनीकरणासाठी नेमके किती रुपये खर्च करण्यात आले, याचा हिशेब मनपातील बांधकाम विभागाकडे नसल्याने व त्यास कुणाची मंजुरी घेण्यात आली, हे स्पष्ट नसल्याने आर्थिकदृष्ट्या कंगाल असलेल्या महापालिकेने हा खर्च कोणत्या शीर्षातून केला? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यासोबतच झालेल्या खर्चाचे देयक कसे देणार? असाही प्रश्न विचारल्या जाऊ लागला आहे.

वर्ष २०२२ मध्ये तत्कालीन सभागृहाची मुदत संपल्यानंतर प्रशासकीय राजवटीत महापौर कक्षाचा वापरच केल्या गेला नाही. २०२४ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सभागृह अस्तित्वात आल्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या कक्षांसह महापौर कक्षाचे नूतनीकरण युद्धपातळीवर करण्यात आले. तथापि प्रशासकीय राजवटीत सर्वसाधारण सभेच्या सभागृहासह अधिकाऱ्यांचे व विविध विभागांच्या कक्षांच्या नूतनीकरणावर वारेमाप खर्च करण्यात आला. सभागृह अस्तित्वात आल्यानंतर महापौर कक्षाचे नूतनीकरण करण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले असून नुकतेच त्याचे उद्घाटन पार पडले. नूतनीकरणाचे आदेश स्वतः महापौरांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे. काम पूर्ण होईस्तोवर त्यांनी त्यांचे कार्यालय स्थायी समितीच्या सभागृहात थाटले होते. शुक्रवारी स्वतःच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांनी आलिशान कक्षाचे उद्घाटन केले व आपला ठिय्या या कक्षात हलविला. महापालिकेस साजेसे कक्ष तयार करण्यात आले असले तरी त्यावर झालेला खर्च किती झाला, यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महापालिकेत कोणतेही काम करण्यापूर्वी संबंधित यंत्रणेकडून मंजुरी घ्यावी लागते. या नूतनीकरणासाठी मात्र हा नियम डावलण्यात आल्याची चर्चा आहे. लाखो रुपये खर्चाच्या कामासाठी निविदाप्रक्रिया करण्यात आलेली नाही, हे वास्तव आहे. आपल्याला यासंदर्भात काहीच माहिती नाही, असे उत्तर शहर अभियंता कांबळे यांनी दिले आहे. तर, कार्यकारी अभियंता रवींद्र पवार यांनी हे काम माझ्याकडे नसल्याने मला त्याबद्दल माहितीच नाही, असे मोघम उत्तर देत बोलणे टाळले आहे. विना निविदा कंत्राटदाराने काम केले असले तरी आता त्याच्या देयकाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. तो कोणत्या शीर्षातून दिल्या जाणार आहे, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. नूतनीकरणास आक्षेप नाही, मात्र त्यासाठी अवलंबण्यात आलेली पद्धत योग्य नाही असा आक्षेप नोंदविण्यात येत आहे. दरम्यान, अमरावती महापालिकेच्या महापौरांचे दालन कार्पोरेट कंपनीच्या सीईओच्या कक्षालाही लाजवणारे असून फाइव्ह स्टार रेटिंगचे झाले आहे.

महापौर कक्षाच्या नूतनीकरणाचे काम कुणाच्या आदेशाने झाले हे मला सद्या माहीत नाही. मी नुकताच शहर अभियंता पदावर रूजू झालो आहे. बांधकाम विभागातील कामकाजाची अद्याप पुरेशी माहिती मला नाही. निविदाप्रक्रिया झाली किंवा अन्य कोण्या शीर्षातून हे काम केल्या गेले, हे तपासून सांगता येईल, त्यासाठी थोडा अवधी लागणार आहे.

श्रीधर कांबळे, शहर अभियंता, मनपा.

------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande