
परभणी, 09 ऑगस्ट (हिं.स.)।
आधार कार्डचा वापर करून दहशतवाद्याने बँक खाते उघडले असून त्याद्वारे आर्थिक व्यवहार झाल्याचा गुन्हा दाखल असल्याची भीती दाखवत सायबर भामट्यांनी सेवानिवृत्त प्राध्यापक दाम्पत्याला ‘डिजिटल अरेस्ट’च्या जाळ्यात अडकवून तब्बल 1 कोटी 11 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार परभणी शहरातील समाधान नगर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात पाच ते सहा अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी हे कृषी महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक असून त्यांच्या पत्नीही प्राध्यापक पदावरून सेवानिवृत्त झालेल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 जुलै रोजी सकाळी सुमारे 9 वाजता फिर्यादींना व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल आला. कॉल करणार्या व्यक्तीने स्वतःची ओळख दिल्ली पोलीस मुख्यालयातील अधिकारी म्हणून करून देत, त्यांच्या आधार कार्डचा वापर एका दहशतवाद्याने बँक खाते उघडण्यासाठी केला असून त्या खात्यातून संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल असल्याचे सांगितले. त्यानंतर वरिष्ठ अधिकार्यांशी बोलण्याच्या बहाण्याने कॉल दुसर्या व्यक्तीकडे जोडण्यात आला. या व्यक्तीने दाम्पत्याला ‘हाऊस अरेस्ट’ करण्यात येत असल्याचे सांगून त्यांच्यावर मानसिक दबाव टाकला. दुसर्या दिवशी पुन्हा संपर्क साधत आधार कार्डचा वापर करून दहशतवाद्यांनी आर्थिक व्यवहार केल्याची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. चौकशी पूर्ण होईपर्यंत जवळील सर्व रक्कम एका खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार दाम्पत्याने वेगवेगळ्या चार खात्यांमधील रक्कम आरटीजीएससह अन्य माध्यमांतून भामट्यांनी सांगितलेल्या खात्यांमध्ये वर्ग केली.
संबंधित रक्कम 30 दिवसांत परत मिळेल, असे आश्वासन आरोपींनी दिले होते. मात्र मुदत उलटल्यानंतरही पैसे परत न आल्याने दाम्पत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संबंधितांचे फोन बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली.
16 जुलै ते 29 जुलै या कालावधीत हा प्रकार घडला असून, 1 कोटी 11 हजार रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात पाच ते सहा अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis