आगामी गणेशोत्सवात गणेशभक्तांचा प्रवास अत्यंत सुखकर आणि विनाअडथळा होईल - उदय सामंत
रत्नागिरी, 9 ऑगस्ट (हिं.स.) । मुंबई-गोवा महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. आगामी गणेशोत्सवात गणेशभक्तांचा प्रवास अत्यंत सुखकर आणि विनाअडथळा होईल, असा ठाम विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. कशेडी घाटातील दरडीसह महामार्गावर पडणाऱ्य
आगामी गणेशोत्सवात गणेशभक्तांचा प्रवास अत्यंत सुखकर आणि विनाअडथळा होईल - उदय सामंत


रत्नागिरी, 9 ऑगस्ट (हिं.स.) । मुंबई-गोवा महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. आगामी गणेशोत्सवात गणेशभक्तांचा प्रवास अत्यंत सुखकर आणि विनाअडथळा होईल, असा ठाम विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. कशेडी घाटातील दरडीसह महामार्गावर पडणाऱ्या दरडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक अभ्यास समिती गठित करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्री सामंत म्हणाले, महामार्गावरील इंदापूर आणि माणगाव येथील बायपासच्या भूसंपादनाचे प्रलंबित प्रश्न आता सुटले असून, तेथील कामे वेगात सुरू आहेत. महाड ते आरवलीदरम्यानचा मार्ग पूर्ण झाला आहे. रत्नागिरीतून अवघ्या साडेचार ते पाच तासांत पनवेल गाठणे शक्य होत आहे. उर्वरित टप्प्यांतील कामे गणपतीपूर्वी पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रत्नागिरी जिल्ह्यातील आरवली ते लांजा या टप्प्यातील कामे प्रगतिपथावर आहेत. विशेषतः लांजा ते हातखंबा दरम्यानचा मार्ग तयार झाला असून, लांजा येथील पुलाचे व चिपळूण उड्डाणपुलाचे कामही वेगाने पुढे सरकत आहे. रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गाबाबत माहिती देताना ते म्हणाले, सध्या रत्नागिरी ते आंबा हे अंतर अवघ्या पाऊण ते एक तासात पार करता येते. मलकापूर आणि बांबवडे येथील बायपासची कामे पूर्ण झाल्यानंतर रत्नागिरीहून कोल्हापूरला अवघ्या दीड ते पावणेदोन तासांत पोहोचणे शक्य होणार आहे. कशेडी घाटात दरड कोसळलेली नसून मुख्य रस्त्यापासून सुमारे २०० मीटर अंतरावरील डोंगर सरकून माती रस्त्यावर आली होती.

महामार्गावर वारंवार होणाऱ्या अशा भूस्खलनाच्या घटनांवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी एक स्वतंत्र अभ्यास समिती नेमण्यात येणार असून, त्यांच्या अहवालानुसार रस्त्याच्या कामात आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील, अशी माहितीही मंत्री सामंत यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande