'एआय’च्या युगात स्वतःची बुद्धिमत्ता आणि गुणवत्ता जपा : डॉ. शंकर नवले
सोलापूर, 09 ऑगस्ट (हिं.स.)।आयुष्यात पुढे जाण्यासाठी आई-वडिलांचे संस्कार आणि शिक्षकांचे प्रोत्साहन अत्यंत महत्त्वाचे असते. सध्या प्रत्येक क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढत आहे. दहा माणसांचे काम एक मशीन करत असल्य
'एआय’च्या युगात स्वतःची बुद्धिमत्ता आणि गुणवत्ता जपा : डॉ. शंकर नवले


सोलापूर, 09 ऑगस्ट (हिं.स.)।आयुष्यात पुढे जाण्यासाठी आई-वडिलांचे संस्कार आणि शिक्षकांचे प्रोत्साहन अत्यंत महत्त्वाचे असते. सध्या प्रत्येक क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढत आहे. दहा माणसांचे काम एक मशीन करत असल्याने विद्यार्थ्यांनी नवे तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. मात्र, तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी प्रत्येक क्षेत्रात माणसांची गरज राहणार आहे. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेसोबतच विद्यार्थ्यांनी स्वतःच्या बुद्धिमत्तेचा आणि गुणवत्तेचा वापर केला पाहिजे,” असे प्रतिपादन एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी केले.

सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या वतीने सहकारमहर्षी कै. वि. गु. शिवदारे स्मृती समारोहांतर्गत दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व मार्गदर्शन सोहळा हिराचंद नेमचंद वाचनालय संकुलातील लोकमान्य टिळक सभागृहात पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शंकर नवले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी समर्थ सहकारी सूत गिरणीचे चेअरमन राजशेखर शिवदारे होते.आपल्या शैक्षणिक प्रवासाविषयी बोलताना डॉ. नवले म्हणाले, “मी स्वतः जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतले असून, आज शिक्षणाच्या निमित्ताने २० देशांमध्ये फिरलो आहे. विद्यार्थ्यांनी आपली आवड आणि क्षमता ओळखूनच करिअरचा विचार करावा. नव्या तंत्रज्ञानाचा वापर कशासाठी आणि किती करायचा, यालाही मर्यादा असली पाहिजे.”“एखादे काम पूर्ण करण्यासाठी एआयची मदत होऊ शकते; मात्र आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर एआय मदतीला येईलच असे नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत स्वतःच्या कौशल्यावर आणि गुणवत्तेवरही भर द्यावा. आपण आयुष्यात किती कमावले यापेक्षा केलेल्या कामातून किती आनंद मिळाला, याचा विचार करावा आणि नेहमी सकारात्मक राहावे,” असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande