
सोलापूर, 09 ऑगस्ट (हिं.स.)सोलापुरातील विणकर बांधवांच्या कौशल्याचा उपयोग त्यांच्या अर्थार्जनासाठी व्हावा आणि सोलापूरची हातमाग उत्पादने राज्यासह देशभरात विकली जावीत, यासाठी या उत्पादनांना मोठी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले.
आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, ७ ऑगस्ट १९०५ रोजी स्वदेशी चळवळीला सुरुवात झाली. त्याची आठवण म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ वर्षांपूर्वी ७ ऑगस्ट हा राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले. त्याला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.सोलापुरातील वस्त्रोद्योगाला पूर्वीचे वैभव मिळवून देण्यासाठी औद्योगिक वसाहतीच्या विकासाकरिता ५६ कोटी रुपयांचा निधी आणला असल्याचे कोठे यांनी सांगितले. सोलापूरच्या टॉवेल, चादर आणि नॅपकिन या उत्पादनांना मोठी बाजारपेठ मिळावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मागणी केली आहे. विणकर बांधवांनी बाजारातील बदल लक्षात घेऊन आपल्या व्यवसायात आवश्यक बदल करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
सोलापूरच्या हातमाग साडीचा पारंपरिक वस्त्रोद्योगात समावेश करण्यासह एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ मध्ये सोलापूरच्या सिल्क साडीचा पारंपरिक वस्त्रोद्योग म्हणून समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या आहेत. त्यामुळे येत्या काही महिन्यांत ही मागणी पूर्ण होईल, असा विश्वास कोठे यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड