सोलापूर जिल्ह्यातील आणखी चार आयुष्मान आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन
सोलापूर, 09 ऑगस्ट (हिं.स.)। केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध सुविधा, सेवा गुणवत्ता, रुग्ण सुरक्षा, स्वच्छता, व्यवस्थापन आणि सेवा वितरणाची तपासणी करून राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन (NQAS) प्रदा
ZP CEO


सोलापूर, 09 ऑगस्ट (हिं.स.)।

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध सुविधा, सेवा गुणवत्ता, रुग्ण सुरक्षा, स्वच्छता, व्यवस्थापन आणि सेवा वितरणाची तपासणी करून राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन (NQAS) प्रदान केले जाते. या राष्ट्रीय स्तरावरील मानांकनात सोलापूर जिल्ह्यातील आणखी चार आयुष्मान आरोग्य मंदिरांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत NQAS मानांकन प्राप्त करणाऱ्या आयुष्मान आरोग्य मंदिरांची संख्या १४ वर पोहोचली आहे.राष्ट्रीय NQAS मूल्यांकनात विजोरी, श्रीपत पिंपरी, लिंबिचिचोळी आणि रातंजन येथील आयुष्मान आरोग्य मंदिरांनी पात्रता मिळविली आहे. यामध्ये विजोरी आरोग्य मंदिराने ८६.९२ टक्के, श्रीपत पिंपरीने ८४.३६ टक्के, रातंजनने ८४.९३ टक्के, तर लिंबिचिचोळी आरोग्य मंदिराने ८० टक्के गुण मिळविले.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांचे अभिनंदन करण्यात आले. जिल्ह्यातील उर्वरित आरोग्य संस्थांनीही राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन मिळविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

आजपर्यंत जिल्ह्यातील १४ आरोग्य संस्थांनी NQAS मानांकनासाठी पात्रता मिळविली आहे. जिल्ह्यातील उर्वरित सर्व आरोग्य संस्थांनाही हे मानांकन मिळवून देण्याचा मानस आहे. नागरिकांना दर्जेदार आणि सुरक्षित आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाचे सातत्याने प्रयत्न सुरू राहतील. असे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी सांगितले

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande