
लातूर, 09 ऑगस्ट (हिं.स.)।
सिद्धी शुगर कारखान्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडत असून, अहमदपूर व चाकूर तालुक्याचा सर्वांगीण विकास कारखान्यामुळे होत आहे. येणाऱ्या काळात कारखान्याच्या माध्यमातून अधिक गाळपाचे उद्दिष्ट असून, ते सर्व सिद्धी शुगर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून पूर्णत्वास जाईल, असा विश्वास सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी उजना, तालुका अहमदपूर येथे व्यक्त केला.
ते उजना तालुका अहमदपूर येथील सिद्धी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजच्या १५ व्या गळीत हंगामाच्या रोलर पूजन प्रसंगी बोलत होते. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी सरपंच साहेबराव जाधव हे होते. तसेच व्यासपीठावर सिद्धी शुगर अँड अलाईट इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव, अहमदपूर पंचायत समितीचे सभापती सुरज पाटील, व्हाईस प्रेसिडेंट पी.जी. होनराव, केन प्रमुख पी.एल. मिटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यापुढे बोलताना बाबासाहेब पाटील म्हणाले की, सिद्धी शुगर कारखान्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये उत्कर्ष निर्माण झाला असून, आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मला राज्याचा सहकार मंत्री म्हणून काम करायची संधी मिळाली आणि आज राज्यातील सर्वात मोठी कर्जमाफी करता आली, याचा अभिमान सुद्धा असल्याचे पाटील म्हणाले. शेतकऱ्यांनी योग्य ऊस लावून त्याची लागवड करावी व कारखान्याकडे त्याची नोंद करावी. सिद्धी शुगर कारखाना भविष्यात अधिक क्षमतेने चालवण्याचा कारखाना प्रशासनाचा मानस असून, सिद्धी शुगर कारखान्याचे कर्मचारी सुद्धा उत्कृष्ट काम करतात त्यामुळे आपल्या कारखान्याचे काम हे उत्कृष्ट असल्याचे सुद्धा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis