लातूर : अतृप्त आत्म्यांच्या आंदोलनावर स्थायी समिती अध्यक्षांची टीका
लातूर, 09 ऑगस्ट (हिं.स.)। लातूर महापालिका आवारात विविध कारणांनी आंदोलन करणाऱ्या काही व्यक्तींवर लातूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष सचिन बंडापल्ले यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली आहे. अशा आंदोलनांमुळे महापालिकेच्या कामकाजा
सचिन बंडापल्ले


लातूर, 09 ऑगस्ट (हिं.स.)।

लातूर महापालिका आवारात विविध कारणांनी आंदोलन करणाऱ्या काही व्यक्तींवर लातूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष सचिन बंडापल्ले यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली आहे. अशा आंदोलनांमुळे महापालिकेच्या कामकाजापेक्षा प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न अधिक होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये बंडापल्ले यांनी, “अतृप्त आत्मा काही ना काही बहाण्याने महापालिका आवारामध्ये येतात. कधी कशाचाही संबंध नसताना काही तरी आंदोलन करतात आणि काहीतरी ओकून जातात,” अशा शब्दांत संबंधितांवर निशाणा साधला.

पुढे ते म्हणाले की, अशा प्रकारच्या आंदोलनांच्या माध्यमातून वर्तमानपत्रे, यूट्यूब चॅनेल्स आणि समाजमाध्यमांवर दोन-चार दिवस चर्चेत राहण्याचा निष्फळ प्रयत्न केला जातो. मात्र, या प्रकारातून संबंधितांच्या प्रगल्भतेचे दर्शन घडते आणि त्यांची कीवही येते, अशी टीका त्यांनी केली.

“लातूरचे संस्कार अबाधित राखण्याचे काम लातूरकर निश्चितच करतील. कितीही आदळआपट केली तरीही…” असा टोला लगावत बंडापल्ले यांनी आपल्या पोस्टमधून विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.

बंडापल्ले यांच्या या वक्तव्यामुळे महापालिका वर्तुळात तसेच शहराच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.

--

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande