अमरावती जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा - कृषी विभाग
अमरावती, 09 ऑगस्ट (हिं.स.)। जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सद्या ७२ हजार ५०२ मेट्रिक टन रासायनिक खतांचा साठा शिल्लक आहे. खतांची टंचाई नसल्याचा दावा कृषी विभागाकडून करण्यात आला असला तरी शेतकऱ्यांनी मात्र युरिया व डीएपीचा तुटवडा असल्याची तक्
कृषी विभाग म्हणते जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा


अमरावती, 09 ऑगस्ट (हिं.स.)। जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सद्या ७२ हजार ५०२ मेट्रिक टन रासायनिक खतांचा साठा शिल्लक आहे. खतांची टंचाई नसल्याचा दावा कृषी विभागाकडून करण्यात आला असला तरी शेतकऱ्यांनी मात्र युरिया व डीएपीचा तुटवडा असल्याची तक्रार कायम ठेवली आहे. जिल्ह्यासाठी कृषी विभागाकडून एक लाख १८ हजार टन खत पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी एक लाख नऊ हजार ५०५ टन खताचा पुरवठा झाला असून, मागील शिल्लक साठ्यासह जिल्ह्यात एक लाख ७३ हजार ७३७ टन खत उपलब्ध झाले होते. यापैकी एक लाख एक हजार २२५ टन खताची विक्री झाली असून, सध्या ७२ हजार ५०२ टन साठा शिल्लक आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रासायनिक खतांचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचे कृषी विभागाच्या ३१ जुलै अखेरच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

या अहवालानुसार, जिल्ह्यात सर्वाधिक मागणी असलेल्या युरिया खताचा ३८ हजार २१५ टन उपलब्ध साठा होता. त्यापैकी २६ हजार २११ टनाची विक्री झाली असून, १२ हजार चार टन साठा शिल्लक आहे. डीएपीच्या १६ हजार ५४४ टन उपलब्ध साठ्यापैकी १० हजार ७४७ टन विक्री झाली असून, पाच हजार ७९७ टन शिल्लक आहे. एमओपी खताचा सात हजार २९ टन साठा उपलब्ध होता. त्यापैकी दोन हजार ३६९ टन विक्री झाली असून चार हजार ६६० टन शिल्लक आहे. संयुक्त खतांचा सर्वाधिक ७४ हजार १७६ टन उपलब्ध साठा असून, ३५ हजार ३०८ टन विक्री झाल्यानंतर ३७ हजार ८६८ टन साठा शिल्लक आहे. एसएसपी खताचा ३५ हजार ९७५ टन उपलब्ध साठा असून, त्यापैकी २५ हजार ६०० टन विक्री झाली आहे. त्यामुळे १० हजार ३७५ टन साठा शिल्लक आहे. खतांची उपलब्धता समाधानकारक असली तरी खरीप हंगामात शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार खत मिळावे, यासाठी कृषी विभागाकडून पुरवठा आणि विक्रीवर लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात खतटंचाईची परिस्थिती नसल्याचा दावा कृषी विभागाकडून करण्यात आला आहे.

खतपुरवठ्याचे नियोजन नियोजित पुरवठा : १, १८, ००० टन प्रत्यक्ष पुरवठा : १, ०९, ५०५ टन एकूण उपलब्ध साठा : १, ७३, ७३७ टन आतापर्यंत विक्री : १, ०१, २२५ टन शिल्लक साठा : ७२, ५०२ टन.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande