
परभणी, 09 ऑगस्ट (हिं.स.)।मानवत तालुक्यातील रूढी येथे शेतातील विहिरीत रविवारी (दि. ९)अंदाजे ३० ते ३५ वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
रूढी येथील गट क्रमांक १९२ मध्ये छत्रपती पांडुरंग होंडे यांच्या शेतातील विहिरीत मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच संबंधितांनी मानवत पोलिसांना कळविले. माहिती मिळताच मानवत पोलीसांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक किशन पतंगे, शेख जावेद व खंडू राऊत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी मृतदेह विहिरीतून बाहेर काढून ओळख पटविण्याच्या दृष्टीने मानवत ग्रामीण रुग्णालयात आणला आहे. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून, ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यासाठी रूढीचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच उपस्थित नागरिकांनी सहकार्य केले. या घटनेबाबत मानवत पोलिसांकडून तपास सुरू असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis