
पुणे, 09 ऑगस्ट (हिं.स.)।पुणे जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. बारामती विमानतळावर रविवारी दुपारी एका खासगी कंपनीचे प्रशिक्षण विमान दुर्घटनाग्रस्त झाले. सुदैवाने, विमानात असलेला प्रशिक्षणार्थी वैमानिक सुरक्षित बचावला. या दुर्घटनेत सध्या कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. विमानाचे मात्र किरकोळ नुकसान झाले आहे.
माहितीनुसार, ही दुर्घटना रविवारी दुपारी सुमारे १२.३५ वाजता विमानतळाच्या परिसरात, धावपट्टीपासून काही अंतरावर घडली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचे समोर आले आहे.विशेष म्हणजे, याच वर्षी जानेवारी महिन्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान दुर्घटनेत मृत्यू झाला होता.
त्यानंतर १३ मे रोजी बारामती येथे एका खासगी कंपनीचे आणखी एक प्रशिक्षण विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते. त्या दुर्घटनेतही कोणालाही गंभीर दुखापत झाली नव्हती. विमानात एकटाच असलेला प्रशिक्षणार्थी वैमानिक बारामती विमानतळाजवळील गोजुबावी गावाच्या परिसरात झालेल्या या दुर्घटनेत सुरक्षित बचावला होता.आता रविवारी झालेल्या दुर्घटनेनंतर अवघ्या आठ महिन्यांच्या कालावधीत बारामती परिसरात विमान दुर्घटनेची ही तिसरी घटना ठरली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode