ट्रेकर्सनी अनुभवली पन्हाळागड ते पावनखिंड मोहीम, परभणीतील स्वराज्य ट्रेकर्सचा उपक्रम
परभणी, 09 ऑगस्ट (हिं.स.)। परभणीतील स्वराज्य ट्रेकर्सच्या वतीने आयोजित पन्हाळगड ते पावनखिंड मोहिमेत शंभरहून अधिक मावळे सहभागी झाले होते. यात लहान मुले, मुली तसेच महिलांची संख्या मोठी होती. स्वराज्य ट्रेकर्सचे संयोजक राजेश्वर गरुड यांच्या मार्गदर
Q


परभणी, 09 ऑगस्ट (हिं.स.)। परभणीतील

स्वराज्य ट्रेकर्सच्या वतीने आयोजित पन्हाळगड ते पावनखिंड मोहिमेत शंभरहून अधिक मावळे सहभागी झाले होते. यात लहान मुले, मुली तसेच महिलांची संख्या मोठी होती.

स्वराज्य ट्रेकर्सचे संयोजक राजेश्वर गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली पन्हाळगड ते पावनखिंड पायी प्रवासाचा ऐतिहासिक क्षण अनुभवण्याची मोहीम काढण्यात आली. त्यासाठी सर्व मावळे अर्थात ट्रेकर्स संध्याकाळी कोल्हापूरजवळील पन्हाळा किल्ल्यावर पोहोचले. पन्हाळगडावर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरात जाऊन सर्वांनी छत्रपतींचा आशीर्वाद घेतला, त्यानंतर बाजीप्रभू देशपांडे व शिवा काशिद यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करून सर्वजण विशाळगडाच्या दिशेने निघाले. छत्रपती शिवाजी महाराज ज्या वाटेने विशाळगडाकडे निघाले होते त्याच वाटेने सर्वजण पायी निघाले. पहिल्या दिवशी पन्हाळगडावरून 923 एकरचे मसाईचे पठार ओलांडून पुढे खोतवाडी, कर्पेवाडी अशी लहान लहान गावे ओलांडत घनदाट जंगल, डोंगर दर्यातून मार्ग काढत ट्रेकर्सनी मार्गक्रमण केले.

पहिला मुक्काम झालेल्या खोतवाडी गावात सर्वांनी गावकऱ्यांची संवाद साधला. खोतवाडीवरून पुन्हा पुढील टप्पा गाठण्यासाठी सर्वजण निघाले. ज्या मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज डोंगरातून गेले त्याच मार्गाने पुन्हा सर्वजण नव्या उमेदीने निघाले. जात असताना ट्रेकर्सनी डोंगर दऱ्यातील ओढयामध्ये मनसोक्त खेळण्याचा आनंदही घेतला. बबन खोत यांना सोबत घेऊन ट्रेकर्स पावनखिंडीकडे निघाले. वाटेतील अवघड मार्ग दाखवण्यासाठी बबन खोत यांच्या मार्गदर्शनाने सर्वजण पुढे गेले. शेवटी ट्रेकर्स पांढरे पाणी गावाजवळ पोहोचले. त्यानंतर अखेरचे ठिकाण म्हणजे शत्रूंना घोडखिंडीत रोखून धरत स्वराज्यासाठी प्राणाची आहुती दिलेल्या वीर बाजीप्रभूच्या त्यागाने पावन झालेल्या स्थळी सर्वजण पोहोचले. याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना सिद्दी जोहरच्या वेढ्यातून सोडवुन विशाळगडावर पोहोचवण्या करता शिवा काशिद, बाजीप्रभू देशपांडे, तीनशे बांदल आणि मावळे यांना वीरमरण पत्करावे लागले.

तेथे वीर बाजीप्रभू यांच्या स्मारकाचे दर्शन घेऊन मोहिमेची सांगता करण्यात आली. या मोहिमेत परभणीसह पुणे, चिखली, जालना येथून ट्रेकर्स सहभागी झाले होते

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande