पत्रकारांच्या प्रश्नांसाठीचा लढा आणखी तीव्र करणार : संदीप काळे
परभणी, 09 ऑगस्ट (हिं.स.)। राज्यात, देशात आणि जगभरात पत्रकारांची परिस्थिती सुधारण्यासाठी पत्रकारांच्या प्रश्नांशी संबंधित लढा आणखी तीव्र करण्यात येणार असून, या लढ्यामध्ये देशभरातील सर्व पत्रकारांनी सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन व्हॉईस ऑफ मीडिय
अ


परभणी, 09 ऑगस्ट (हिं.स.)।

राज्यात, देशात आणि जगभरात पत्रकारांची परिस्थिती सुधारण्यासाठी पत्रकारांच्या प्रश्नांशी संबंधित लढा आणखी तीव्र करण्यात येणार असून, या लढ्यामध्ये देशभरातील सर्व पत्रकारांनी सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे संस्थापक व आंतराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी केले.

परभणी येथे आयोजित महाराष्ट्र राज्याच्या केडर कॅम्पच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के, नवनिर्वाचित राज्य सरचिटणीस विशाल पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया, अजितदादा कुंकुलोळ, नरेंद्र देशमुख आदी उपस्थित होते. तसेच कचरू सारडा, चेतन कात्रे, विभागीय अध्यक्ष सचिन मोहिते, गोरखनाथ मदने, डॉ. गणेश जोशी यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

संदीप काळे म्हणाले की, जगभरातील पत्रकारांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. पत्रकारांच्या हत्या, त्यांना तुरुंगात डांबणे, त्यांच्यावर होणारे अत्याचार, धमक्या आणि विविध प्रकारचे दबाव सातत्याने वाढत आहेत. भारतात तसेच महाराष्ट्रातही पत्रकारांवरील दबाव आणि हल्ल्यांचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढले आहे. पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पत्रकारांना लक्ष्य करण्याचे प्रकार थांबले पाहिजेत. विविध कायद्यांचा गैरवापर करून पत्रकारांच्या अभिव्यक्तीवर निर्बंध आणण्याचे प्रयत्नही थांबविण्याची गरज आहे.

सरकारने पत्रकारांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून त्यांच्या संरक्षणासाठी ठोस भूमिका घ्यावी. पत्रकारांच्या हक्कांसाठी आवश्यक ती पावले उचलली गेली नाहीत, तर व्हाईस ऑफ मीडिया अधिक तीव्रतेने रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही संदीप काळे यांनी दिला. देशभरातील पत्रकारांच्या प्रश्नांसाठी नुकतेच दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करण्यात आले असून, हा लढा यापुढे आणखी व्यापक आणि तीव्र करण्यासाठी व्हाईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनलने पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, पत्रकार हा केवळ बातमी देणारा घटक नाही, तर समाजातील घडामोडींचा आरसा आहे. समाजातील अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार आणि सामान्य नागरिकांच्या समस्या शासन आणि समाजासमोर मांडण्याचे काम पत्रकार करतो. त्यामुळे पत्रकार सुरक्षित आणि स्वतंत्र असणे हे लोकशाहीच्या बळकटीसाठी अत्यंत आवश्यक आहे. पत्रकार सुरक्षित नसेल तर मुक्त आणि निर्भीड पत्रकारिता कशी होणार, हा प्रश्न आज गंभीरपणे विचारण्याची गरज आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande