
पुणे, 09 ऑगस्ट (हिं.स.)।येरवडा येथील आदित्य नारायण सहकारी गृहरचना संस्था (एम-२४) या सुमारे ४० वर्षे जुन्या म्हाडा इमारतीच्या पुनर्विकासासाठी सादर केलेल्या आराखड्यास तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी सोसायटीने म्हाडा आणि पुणे महापालिकेकडे केली आहे. इमारत जीर्ण व धोकादायक झाल्याचा दावा करत संभाव्य दुर्घटनेसाठी संबंधित यंत्रणांना जबाबदार धरण्याचा इशारा सोसायटीने दिला आहे.लोड बेअरिंग पद्धतीने बांधलेली ही इमारत सध्या अत्यंत कमकुवत झाल्याचे सोसायटीचे म्हणणे आहे. इमारतीच्या स्लॅबचे तुकडे कोसळणे, गळती होणे तसेच लोखंडी सळ्या उघड्या पडण्याच्या घटना घडत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून पुनर्विकासाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत खंडाळे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, पुनर्विकासासाठी आवश्यक असलेली अभिहस्तांतरण, भाडेपट्टा, विक्रीखत, प्रॉपर्टी कार्ड, स्ट्रक्चरल ऑडिट, अग्निशामक, पर्यावरण, एअर फोर्सचे ना-हरकत प्रमाणपत्र, म्हाडाचे ना-देय प्रमाणपत्र यांसह आवश्यक परवानग्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. पुनर्विकासाचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी सादर करूनही आराखड्याला अद्याप मंजुरी मिळालेली नसल्याचे सोसायटीने म्हटले आहे.दरम्यान, पुणे महापालिकेचे शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी म्हाडाच्या एका इमारतीस स्वतंत्र बांधकाम परवानगी सध्या देता येत नसल्याचे स्पष्ट केले. “म्हाडाचा आराखडा सुधारण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यास मान्यता मिळाल्यास प्रत्येक इमारतीला बांधकाम परवानगी देता येईल. सध्या मात्र परवानगी देता येणार नाही. याबाबत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे,” असे पावसकर यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु