भारताने श्रीलंकेविरुद्धचा सराव सामना 6 विकेट्सने जिंकला
कोलंबो, 09 ऑगस्ट (हिं.स.)यशस्वी जैस्वालच्या ६१ धावा आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या स्फोटक फलंदाजीने भारताने सराव सामन्याच्या तिसऱ्या आणि अंतिम दिवशी श्रीलंका इलेव्हनला सहा गडी राखून पराभूत केले. सिराजने शेवटच्या षटकात सलग तीन षटकार मारून भारत
मोहम्मद सिराज


कोलंबो, 09 ऑगस्ट (हिं.स.)यशस्वी जैस्वालच्या ६१ धावा आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या स्फोटक फलंदाजीने भारताने सराव सामन्याच्या तिसऱ्या आणि अंतिम दिवशी श्रीलंका इलेव्हनला सहा गडी राखून पराभूत केले. सिराजने शेवटच्या षटकात सलग तीन षटकार मारून भारताला शानदार विजय मिळवून दिला. श्रीलंका क्रिकेट इलेव्हनने आपला दुसरा डाव २००/६ धावांवर घोषित केला आणि भारतासमोर २०७ धावांचे लक्ष्य ठेवले. भारताला शेवटच्या दोन षटकांत २३ धावांची गरज होती. सिराजने १५ चेंडूंमध्ये नाबाद ३२ धावा करून हे लक्ष्य केवळ ४५ षटकांत पूर्ण केले.

विजय मिळवण्यासाठी भारताला शेवटच्या दोन षटकांत वेगाने धावा करणे आवश्यक होते. सिराजने ४४ व्या षटकात सोनल दिनुशाच्या गोलंदाजीवर षटकार मारला. त्यानंतर त्याने ४५ व्या आणि शेवटच्या षटकात केसरा नुवान्थाविरुद्ध सलग तीन चेंडूंवर तीन षटकार मारून सामना संपवला. सिराजने विविध दिशांना शानदार फटके मारून तीन चेंडू शिल्लक असताना भारताला विजय मिळवून दिला.

सराव सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय कर्णधार शुभमन गिलचे मैदानावर पुनरागमन हे संघासाठी एक दिलासादायक बाब होती. गुरुवारी सराव सत्रादरम्यान उजव्या हाताच्या अनामिकेला दुखापत झाल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गिलने पहिले दोन दिवस मैदानाबाहेर घालवले होते.

दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालसोबत डावाची सुरुवात करताना गिलने ४४ धावा केल्या. फिरकी गोलंदाजांविरुद्ध त्याचे फूटवर्क प्रभावी होते, पण रमेश मेंडिसच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो फाइन लेगला झेलबाद झाला. पहिल्या डावात खाते उघडण्यात अपयशी ठरलेल्या जैस्वालने दुसऱ्या डावात ६१ धावा करून शानदार पुनरागमन केले.

ऋषभ पंतने ६८ चेंडूंमध्ये एक चौकार आणि तीन षटकारांसह २८ धावा केल्या. यापूर्वी पहिल्या डावात तो केवळ दोन धावांवर बाद झाला होता. ध्रुव जुरेल १२ धावांवर विश्व फर्नांडोच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षकाच्या हाती झेलबाद झाला. रवींद्र जडेजाने आपला प्रभावी फॉर्म कायम ठेवत दुसऱ्या डावात वेगवान २२ धावा केल्या. यापूर्वी त्याने पहिल्या डावात ६३ धावा केल्या होत्या. मानव सुथार, गुरनूर ब्रार आणि सारांश जैन यांनाही फलंदाजीची संधी मिळाली.

तत्पूर्वी, भारताने आपला पहिला डाव ३५७/६ धावांवर घोषित केला. श्रीलंका इलेव्हनने दुसऱ्या डावात फलंदाजीला सुरुवात केली, तेव्हा ढगाळ हवामानातील सुरुवातीच्या ओलाव्याचा भारतीय वेगवान गोलंदाजांना फायदा झाला. मोहम्मद सिराजने रविंदू रसंथाला बाद करून संघाला सुरुवातीचे यश मिळवून दिले. प्रसिद्ध कृष्णाने आक्रमक गोलंदाजी करत पसिंदू सुरियाबंदरला त्रिफळाचीत केले.

गुरनूर ब्रारने आपल्या अतिरिक्त उसळीने प्रभावित केले. त्याने पवन रत्नायके आणि कर्णधार सोनल दिनुशा यांना बाद करत ३७ धावांत दोन बळी मिळवले. रवींद्र जडेजानेही दोन बळी घेतले, ज्यात ४६ धावा करणाऱ्या निपुण धनंजयाचा समावेश होता. श्रीलंका इलेव्हनकडून, निशन मदुष्काने दुसऱ्या डावात ७३ चेंडूंमध्ये ६३ धावा करत शानदार फलंदाजी केली. हे त्याचे सामन्यातील दुसरे अर्धशतक होते. श्रीलंका इलेव्हनने ४५ षटकांत २००/६ धावांवर आपला डाव घोषित केला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande