
छत्रपती संभाजीनगर, 09 ऑगस्ट (हिं.स.)।
श्री. खंडोबा महाराज संस्थान भंडारगड या अतिशय पवित्र आणि ऐतिहासिक भूमीवर निसर्गसंवर्धनाचा एक अतिशय स्तुत्य आणि प्रेरणादायी उपक्रम आमदार संतोष दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. ग्रामसेवक संघटना तसेच पळसखेडा मुर्तड, देहेड आणि वरुड बु. या ग्रामपंचायतींच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य वृक्षारोपण सोहळ्यात तब्बल १,००० वृक्षांचे रोपण करण्याचा योग आला.
आमदार संतोष दानवे यावेळी बोलताना म्हणाले,
भंडारगडाचा हा निसर्गरम्य परिसर येणाऱ्या काळात अधिक हिरवागार, समृद्ध आणि नयनरम्य बनवण्यासाठी प्रशासन, सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन घेतलेला हा पुढाकार खरोखरच कौतुकास्पद आहे.
केवळ वृक्षारोपण करून न थांबता, या लावलेल्या प्रत्येक रोपाचे सुयोग्य जतन आणि संगोपन करण्याचा दृढ संकल्प या वेळी सर्वांनी मिळून घेतला. आपल्या भावी पिढीला हरित आणि आरोग्यदायी निसर्गाचा वारसा देण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे.पर्यावरण संतुलनासाठी आणि निसर्गाचे ऋण फेडण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम आहे.
याप्रसंगी ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज, ह.भ.प. विष्णु महाराज सास्ते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण वेणेकर, तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष डी. बी. काळे यांच्यासह यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis