
यवतमाळ, १ सप्टेंबर (हिं.स.) : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत तब्बल ७०१ शिक्षक पदांची भरती होणार असताना यवतमाळ जिल्ह्याचा पर्याय निवडण्यास उमेदवारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. पवित्र पोर्टल प्रणालीअंतर्गत केवळ ५१० उमेदवारांनी पदनिवडीचा विकल्प निवडला आहे. त्यामुळे विविध संवर्गातील तब्बल १९१ शिक्षक पदे रिक्त राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२५च्या आधारे पवित्र पोर्टल प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्यातील सर्वसाधारण तसेच पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा विचार करून ७०१ शिक्षक पदांची जाहिरात पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली होती. या पदांसाठी पात्र उमेदवारांना यवतमाळ जिल्ह्यात पदनिवडीचा विकल्प देण्याची संधी देण्यात आली होती.
या प्रक्रियेत यवतमाळ जिल्ह्याचा पर्याय निवडलेल्या पात्र उमेदवारांची ५१० जणांची यादी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला प्राप्त झाली आहे. आता या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे.
पवित्र पोर्टलअंतर्गत पदनिवडीचा विकल्प दिलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी बुधवार, २ सप्टेंबर ते शुक्रवार, ४ सप्टेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत जिल्हा परिषदेच्या सभागृहात करण्यात येणार आहे.
पात्र उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्रात नोंदविलेल्या माहितीशी संबंधित सर्व मूळ कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच तपासणी यादीप्रमाणे आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती घेऊन निर्धारित वेळेत उपस्थित राहावे लागणार आहे.
कागदपत्रे पडताळणीसाठी उमेदवारांनी निर्धारित कालावधीत आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा यांनी केले आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या अखत्यारीत सहा हजारांहून अधिक शिक्षकांची पदे मंजूर आहेत. मात्र, मंजूर पदांच्या तुलनेत प्रत्यक्ष कार्यरत शिक्षकांची संख्या कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिक्षकांची मोठी आवश्यकता आहे.
दरम्यान, शिक्षक पदभरतीच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा अडथळा ठरणारा गुंतागुंतीच्या रोस्टरचा मुद्दा शिक्षण विभागाने निकाली काढला आहे. त्यानंतर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२५नुसार पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला.
जिल्ह्यात रिक्त असलेल्या ७०१ शिक्षक पदांची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर मोठ्या संख्येने उमेदवार यवतमाळ जिल्ह्याचा पर्याय निवडतील, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात केवळ ५१० उमेदवारांनीच यवतमाळला पसंती दिली आहे.
७०१ पदांच्या तुलनेत ५१० उमेदवारांनीच विकल्प दिल्याने १९१ पदे रिक्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षकांची गरज असतानाही उपलब्ध पदे पूर्णपणे भरण्यात अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे या शिक्षक भरती प्रक्रियेत मुलाखतीशिवाय पदनिवड केली जाणार आहे. पवित्र पोर्टलवरील पात्रता, पदनिवड विकल्प आणि संबंधित निकषांच्या आधारे भरती प्रक्रिया पुढे नेली जाणार आहे. त्यामुळे आता कागदपत्र पडताळणीनंतर प्रत्यक्ष किती उमेदवार पात्र ठरतात आणि किती पदे भरली जातात, याकडे शिक्षण विभागासह उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी